बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या वृद्धेच्या पायात अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 11:27 AM2020-02-04T11:27:47+5:302020-02-04T11:35:53+5:30

जखमेची पट्टी बदलताना आरोग्य विभागाचा हा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Larvae in elderly womens feet who receiving treatment at Beed District Hospital | बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या वृद्धेच्या पायात अळ्या

बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या वृद्धेच्या पायात अळ्या

Next
ठळक मुद्देआरोग्य विभागात खळबळ  पट्टी बदलताना प्रकार चव्हाट्यावर

बीड : जिल्हा रुग्णालयात चार दिवसांपूर्वी दाखल झालेल्या वृद्ध महिलेच्या पायात अळ्या झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. जखमेची पट्टी बदलताना आरोग्य विभागाचा हा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

गऊबाई वामन जगताप (८५, रा. सात्रा, ता. बीड) असे उपचार घेणाऱ्या महिलेचे नाव आहे. गऊबाई यांच्या पायाला थोडीशी जखम झाल्याने त्यांना चार दिवसांपूर्वी नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात आणले. निदान करून त्यांना वॉर्ड क्र. ३ मध्ये दाखल केले. उपचाराकडे दुर्लक्ष झाल्याने जखम दिवसेंदिवस गंभीर होत गेली. त्यामुळे पायाला गँगरीन झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, एवढी गंभीर परिस्थिती असतानाही डॉक्टरांकडून वेळच्या वेळी पट्टी बदलणे किंवा जखम स्वच्छ करणे अपेक्षित होते; परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नातेवाईकांनी विनंती केल्यानंतर परिचारिकांनी जखम स्वच्छ करून पट्टी बदलली. याच वेळी जखमेत अळ्या झाल्याचे उघडकीस आले. हा प्रकार पाहून नातेवाईकांना धक्काच बसला. 

एकीकडे जिल्हा रुग्णालय तत्पर उपचार करण्यात अव्वल  असल्याचा गवगवा केला जातो, तर दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे घटना होणे निंदनीय आहे. त्यामुळे उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, त्यांच्यावर कारवाईची मागणी  आहे.

यापूर्वी डोक्यात अळ्या पडल्याचा प्रकार उघडकीस
साधारण महिन्यापूर्वी झाडावरून पडलेल्या व्यक्तीच्या डोक्याला जखम झाली होती. वेळीच जखम स्वच्छ न केल्याने, तसेच वेळेवर पट्टी न बदलल्यामुळे त्या रुग्णाच्या डोक्यात अळ्या पडल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी सलाईनमध्ये शेवाळ निघाल्याने खळबळ उडाली होती. रोज नवनवीन प्रकार समोर येत असल्याने जिल्हा रुग्णालयातील उपचाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

संबंधित रुग्णावर उपचार करण्याबाबत हलगर्जी झाली आहे काय, याची पाहणी केली जाईल. स्वत: तपासणी करील. 
- डॉ. सुखदेव राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, बीड

Web Title: Larvae in elderly womens feet who receiving treatment at Beed District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.