बीड : भाजपचे आ. सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसलेवर बीडच्या शिरूर पोलिस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो चार दिवसांपासून फरार आहे. त्याच्या शोधासाठी शिरूरसह स्थानिक गुन्हे शाखेची पथके धावपळ करत आहेत. परंतु, हा खोक्यादेखील वाल्मीक कराडप्रमाणेच सरेंडर होणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. कराडबाबतही अशीच माहिती दोन दिवस अगोदर बाहेर आली होती.
खोक्या भोसले याने बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला अर्धनग्न करून बॅटने बेदम मारहाण केली होती. याचा व्हिडीओ ५ मार्च रोजी व्हायरल झाला. त्यानंतर याच खोक्याकडून पैशांचे बंडल फेकणे, हेलिकॉप्टरमधून उतरणे, हातात, गळ्यात सोन्याचे दागिने असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर वन विभागाला वाळलेले मांस, हत्यार, शिकारीचे जाळे आणि इतर साहित्य आढळले होते. तसेच दिलीप ढाकणे व महेश ढाकणे यांना कुऱ्हाड व सत्तूरने बेदम मारहाण केली होती. या प्रकरणात आतापर्यंत वन विभागात एक आणि शिरूर पोलिस ठाण्यात दोन असे तीन गुन्हे दाखल झाले आहेत.
'खोक्या'च्या साडूने मागितली एक कोटीची खंडणी; पाथर्डीत गुन्हा
बीड जिल्ह्यात सध्या गाजत असलेला सतीश ऊर्फ खोक्या भोसलेचा पाथर्डी येथील साडू प्रशांत अरफान चव्हाण ऊर्फ गब्या याच्याविरोधात पाथर्डी पोलिस स्टेशनला एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी रविवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. जमिनीच्या वादातून हा गुन्हा दाखल झाला आहे.
अजितनाथ खेडकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रशांत अरफान चव्हाण ऊर्फ गब्या चव्हाण, शिल्पा प्रशांत चव्हाण, सुनीता संजय भोसले, इंदूबाई आबाशा चव्हाण, शिल्पा अमोल काळे, संतोष अब्बास चव्हाण, काजल भाऊराव काळे, अनिता निस्तान काळे (सर्व रा. निपाणी जळगाव, ता. पाथर्डी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
खोक्या भोसले या आरोपीवर दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या शोधासाठी वेगवेगळी पथके तयार केलेली आहेत. लवकरच त्याला अटक करू - नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक, बीड