पुरुषोत्तम करवा
माजलगाव : येथील माजलगाव धरणाची पाणीपातळी बुधवारी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे दोन सेंटीमीटरने वाढली. पावसाळ्याआधीच सलग दुसऱ्या वर्षी पाणीपातळीत वाढ झाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
मागील वर्षी मे महिन्यात माजलगाव धरणाची पाणीपातळी अत्यंत खालावली होती. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार गैरमोसमी पाऊस पडल्याने २ जून रोजीच धरणाच्या पाणीपातळीत दोन टक्के वाढ झाली होती; तर परतीच्या पावसाने हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने दीड ते दोन महिने धरणातून सिंदफना नदीपात्रात पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कालव्यांद्वारे अनेक वेळा पिकांसाठी पाणी सोडण्यात आले होते. गेल्या वर्षी धरण भरल्यामुळे सिंचनाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती.
या वर्षी चांगला पाऊस पडेल, असा हवामान खात्याने अंदाज वर्तविल्याने व मान्सूनपूर्व पाऊस दोन दिवसांपासून पडत असल्याने नाली, ओढे वाहू लागले आहेत.
बुधवारी रात्री २९ मिलिमीटर जोरदार पाऊस पडला होता. यामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली.
माजलगाव धरणात २ जून रोजी ४२७.४४ मीटर एवढा पाणीसाठा होता. यावेळी धरणात १९३.६० द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा होता; तर ५१.६०द.ल.घ.मी. एवढा उपयुक्त पाणीसाठा होता. १६.६० टक्के पाणी होते. ३ जून रोजी धरणात ४२७.४६० मीटर एवढा पाणीसाठा होता. धरणात १९४.४० द.ल.घ.मी. एवढा एकूण पाणीसाठा होता; तर ५२.४० द.ल.घ.मी. एवढा उपयुक्त पाणीसाठा होता. १६.७९ टक्के पाणीसाठा झाला होता. मान्सूनपूर्व पावसात ०.२५ टक्के पाणीपातळी वाढली. या धरणाच्या इतिहासात प्रथमच मागील दोन वर्षांत बेमोसमी पावसामुळे पाणीपातळी वाढली. या वाढलेल्या पाणीपातळीमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
===Photopath===
030621\img_20190516_122545_14.jpg