बीड : राज्यात दहशत असलेल्या बीडमधील कुख्यात आठवले गँगकडून शुक्रवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास इमामपूर रोडवरील प्रकाश आंबेडकरनगर भागात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात झोपेत असलेल्या एका व्यक्तीला दोन गोळ्या लागल्या असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी आठवले गँगमधील तिघा भावांसह सहा जणांविरोधात पेठबीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गोळीबार प्रकरणी रात्री पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून मोटारसायकल जप्त केली आहे.
विश्वास दादाराव डोंगरे (वय २१, रा. प्रकाश आंबेडकरनगर, बीड) असे गंभीर जखमीचे नाव आहे. आरोपींमध्ये अक्षय शामराव आठवले, सनी शामराव आठवले, आशिष शामराव आठवले (तिघेही रा. माळीवेस), मनीष क्षीरसागर (रा. स्वराज्यनगर), प्रसार मोतीराम धिवार (रा. प्रकाश आंबेडकरनगर) आणि ओमकार पवार (रा. बीड) यांचा समावेश आहे. आठवले आणि डोंगरे यांच्यात जुना वाद आहे. काही महिन्यांपूर्वी याच भागात या दोन्ही गटांत वाद झाला होता. तेव्हाही तलवार, कुकरी, गावठी कट्टा आदी शस्त्रे वापरण्यात आली होती. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने काही आरोपींना पकडले होते. त्यानंतर काही दिवस हे प्रकरण शांत राहिले. परंतु, शुक्रवारी पहाटे पुन्हा याच ठिकाणी वाद झाला. आठवले बंधूंसह सहाजण बार्शी नाका परिसरातील प्रकाश आंबेडकरनगर भागात गेले. तेथे डोंगरे यांच्या घरात शिरले. त्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. यामध्ये झाेपलेल्या विश्वास डोंगरे यांना दोन गाेळ्या लागल्या. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बीडमध्ये प्राथमिक उपचारानंतर छत्रपती संभाजीनगरला नेण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी एक पथक रुग्णालयात पाठविले. तेथे जखमी विश्वास डोंगरे यांचा मुलगा अभिषेक यांच्या जबाबावरून सहा जणांविरोधात पेठबीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
एकजण ताब्यातगोळीबार प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेऊन वेगाने तपासास सुरुवात केली. शुक्रवारी सायंकाळी गोळीबारातील आरोपी असलेल्या प्रसार धीवर याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक मोटारसायकलही पोलिसांनी जप्त केली. पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज हे तपास करत आहेत.
पोलिस अधीक्षकांची धावजिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण, परळीतील उद्योजकाचे अपहरण आणि पवनचक्की अधिकाऱ्याकडे मागितलेल्या खंडणीचे प्रकरण हे सर्व प्रकार ताजे असतानाच बीडमध्ये कुख्यात आरोपींकडून गोळीबार झाला. हे समजताच पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके तयार करून तातडीने अटक करण्याच्या सूचनाही दिल्या.
अक्षय, सनीविरोधात २०१७ साली मोक्काअक्षय आठवले, सनी आठवले हे कुख्यात आरोपी आहेत. यांच्याविरोधात २०१७ साली तत्कालीन पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी मोक्का लावला होता. त्यानंतर काही दिवस ही टोळी शांत होती. काही महिन्यांपूर्वी अक्षय आठवले याला मध्य प्रदेशमध्ये गावठी कट्टे घेऊन जाताना पकडले होते. या गँगवर १५ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. साधारण दाेन ते तीन महिन्यापूर्वी अक्षय हा जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर त्याने शुक्रवारी पहाटे आपले भाऊ आणि साथीदारांसह गोळीबार केला.
मनीष क्षीरसागर बनावट नाेटातील आरोपीकाही महिन्यांपूर्वी १००, २००, ५०० रुपयांच्या बनावट नोटा बाजारात आल्या होत्या. या प्रकरणात पोलिसांनी मनीष क्षीरसागर याला निष्पन्न केले होते. परंतु, तो मिळून आला नव्हता. आता हाच मनीष या गोळीबार प्रकरणातही आरोपी आहे. फरार असलेले आरोपी बीडमध्ये येऊन गंभीर गुन्हे करत असताना पोलिसांना माहीत कसे होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.