बीड : मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुदर्शन सांगळे यांना अटक करण्यात वायबसे दाम्पत्याची पोलिसांना मदत झाली. आता त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे; परंतु गरज पडली, तर पुन्हा बोलवू, या अटीवर हे दाम्पत्य सोडल्याचे सूत्रांनी सांगितले.
डॉ. संभाजी वायबसे धारूर तालुक्यातील कासारी येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पत्नी सुरेखा या वकील आहेत. डॉ. वायबसे हे ऊसतोड मुकादमही आहेत. त्यांनी अनेकदा मजुरांचे अपहरण करण्यासाठी सुदर्शन घुलेची मदत घेतली होती. त्यांच्यात आर्थिक व्यवहारही झालेले आहेत. याच अनुषंगाने बीड पोलिसांनी डॉ. वायबसे यांना नांदेडमधून बीडला आणत चौकशी केली होती. त्यांच्यापासून सुदर्शन घुलेचा क्ल्यू मिळाला होता. घुले आणि सांगळे यांना पुण्यातून पकडताच शनिवारी सायंकाळी वायबसे दाम्पत्याला नोटीस देऊन सोडण्यात आले; परंतु जर गरज पडली, तर चौकशीसाठी पुन्हा बोलावले जाईल, असे सांगण्यात आले, तसेच गाव सोडू नका, दूर जाऊ नका, अशा सूचनाही या दाम्पत्याला केल्या आहेत.