बीड: "बीडला पहिली रेल्वे धावेल आणि त्याच रेल्वेखाली जीवन संपवणारा मी पहिला असेल." हे शब्द आहेत एका हतबल मुलाचे, जो गेल्या चार वर्षांपासून आपल्या हरवलेल्या वडिलांचा शोध घेत आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे निराश झालेल्या प्रसाद रत्नाकरराव बोरे (वय ३८) या तरुणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलवर पत्र लिहून आपला जीव देण्याचा इशारा दिला आहे. पालकमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून व्यथा मांडण्याच्या प्रयत्न केला असता त्यांची वेळ देखील मिळत नसल्याचे बोरे यांनी हतबल होऊन सांगितले.
जिल्ह्यात बहुचर्चित असलेली रेल्वे प्रत्यक्षात १७ सप्टेंबर रोजी, मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी रोजी सुरू होणार आहे.बीड ते अहिल्यानगर रेल्वेला १७ सप्टेंबरला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार येणार आहेत. प्रसाद बोरे यांना शहरात येणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी वेळ देण्यात आला नाही. मात्र, त्यांनी मुख्यमंत्र्यांना मेल पाठवून हरवलेल्या वडिलांना शोधून देण्याची मागणी केली आहे. पोलीस प्रशासनाची अपेक्षित साथ नाही, स्वतः राज्यभर शोध घेऊनही वडिल सापडत नाहीत, यामुळे जगण्यात अर्थ राहिला नसल्याने हतबल होऊन बोरे यांनी जीवन संपविण्याचा इशारा दिला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?बीडमध्ये वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले प्रसाद बोरे यांचे वडील रत्नाकर अंबादास बोरे हे २८ जुलै २०२१ पासून पांगरी रोड, बीड येथून बेपत्ता आहेत. वडिलांच्या मिसिंगची तक्रार दाखल केल्यापासून प्रसाद यांनी त्यांचा शोध घेण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. पिंपरी-चिंचवड येथे एका सीसीटीव्हीमध्ये त्यांचे वडील दिसले, अशी माहिती मिळाल्यानंतरही पोलिसांनी विशेष तपास केला नाही, असा आरोप प्रसाद यांनी पत्रात केला आहे.
'पोलिसांची उत्तरं बालिशपणाची होती'प्रसाद यांनी आपल्या पत्रात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणतात, "आम्ही बीड पोलिसांना कळवले, पिंपरी-चिंचवड पोलिसांना माहिती दिली, पण बीड पोलिसांची उत्तरं अगदी बालिशपणाची होती. राजकीय दबाव असल्याशिवाय पोलीस काम करत नाहीत, हे तेव्हा लक्षात आले."चार वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात वडिलांना शोधूनही ते सापडले नाहीत. प्रसाद यांच्या मते, त्यांच्या वडिलांचे कोणाशीही घरगुती किंवा वैयक्तिक वाद नव्हते, तरीही ते अचानक बेपत्ता झाले. या आघाताने त्यांच्या आईची तब्येतही बिघडली आहे.
"सामान्य नागरिकांना मेल्याशिवाय न्याय मिळत नाही"प्रसाद यांनी आपल्या पत्रात, बीडमध्ये सामान्य नागरिकांना मेल्याशिवाय न्याय मिळत नाही, असे गंभीर विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, "गेल्या महिन्यात एक मुलगा जो ७ वर्षांपूर्वी हरवला होता, तो पोलिसांना सापडला. मग माझ्या वडिलांना चार वर्षांपासून पोलीस का शोधू शकले नाहीत?" हा प्रश्न त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
आत्महत्येनंतरच्या तीन अटीआपल्या पत्रात प्रसाद यांनी १७ सप्टेंबर रोजी बीड रेल्वेच्या उद्घाटनाच्या दिवशी पहिली आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्र्यांना तीन महत्त्वाच्या इच्छाही सांगितल्या आहेत:- त्यांच्या मृत्यूनंतर मृतदेह त्यांच्या परिवाराकडे घरपोच देण्यात यावा.- परिवाराला कोणतीही आर्थिक मदत (भीक) दिली जाऊ नये, कारण त्यांचा परिवार स्वाभिमानी आहे.- या आत्महत्येचे राजकारण केले जाऊ नये.
या पत्राने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली असून, आता पोलीस आणि सरकार यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.