Beed Accident:बीडवरून गेवराईकडे जाणारी जीप पलटी झाली. तिला क्रेनच्या सहाय्याने बाजूला घेतले जात होते. याचवेळी गेवराईहून बीडकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने मदत करणाऱ्या लोकांना चिरडले. यात सहा जण जागीच ठार झाले. ही घटना गढीजवळ सोमवारी मध्यरात्री १२ वाजता घडली. अपघातातील सर्व मृत हे गेवराई शहर आणि परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.
बीडवरून एक जीप गेवराईकडे जात होती. पण पाऊस चालू असल्याने चालकाचे नियंत्रण सुटुन हा अपघात झाला. ही जीप रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. याचवेळी गेवराईचे तरुण बीडकडे जात होते. त्यांना हा अपघात दिसल्यावर त्यांनी क्रेनच्या साह्याने जीप बाजूला करण्यासाठी मदत करणे सुरु केले. यावेळी भरधाव कंटेनरने या मदत करणाऱ्या तरुणांना चिरडले व हा कंटेनर निघून गेला. अपघाताचा आवाज होताच परिसरातील नागरिक धावले व त्यांनी तरुणांना तातडीने गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु सर्वांना मृत घोषित केले. रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात नातेवाईक व नागरिकांची गर्दी होती.
या अपघातात सचिन रमेश नन्नवरे (३५, रा. संजयनगर, गेवराई), बाळासाहेब ज्ञानोबा आतकरे (३६, रा. सावतानगर, गेवराई), दीपक राजपाल सुरय्या (४२, रा. गढी), कृष्णा जाधव (३५, संजयनगर, गेवराई), भागवत गंगाधर परळकर (३९, रा. रंगार चौक, गेवराई), मनोज वैजिनाथ करांडे (३९, रा. रांजणी) हे सहा जण ठार तर योगेश शिंदे (रा. खळेगाव) व अन्य एक जण जखमी झाला. या घटनेने शोककळा पसरली होती.