त्रिकूट सरकारच्या परिपत्रकाची नांदुर घाट शिवप्रेमींनी केली होळी
तीव्र शब्दात निषेध केला व्यक्त. नांदुर घाट शिवप्रेमी
नांदुरघाट : शिवजयंतीसंदर्भात राज्याच्या गृहविभागाने काढलेल्या परिपत्रकाची येथील शिवप्रेमींनी होळी केली असून, सरकारला प्रचार सभा, गर्दीतील बाजार, आंदोलन, मतदान प्रक्रिया, प्रचार रॅली चालते मग छत्रपतींच्या जयंतीबद्दल निर्बंध का? असा सवाल यावेळी करण्यात आला.
गृहविभागाने परिपत्रक काढून सूचना केल्या आहेत. त्यात दहा व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. आठ ते नऊ महिने शासनाचा प्रत्येक नियम जनतेने पाळला. कडकडीत लॉकडाऊन पाळल्यानंतर मागील एक ते दोन महिन्यांपासून सर्व सुरळीत सुरू आहे. शाळा, कॉलेज सिनेमागृह सुरू करण्यात आले आहेत. राजकीय नेत्यांचे गावोगावी दौरे सुरू आहेत. त्यांच्या मोठ्या सभा होत आहेत. लग्न समारंभ मोठे होऊ लागले आहेत. प्रत्येक ठिकाणचा आठवडी बाजार तितक्याच मोठ्या गर्दीने भरत आहे. मोठमोठे आंदोलने होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या रॅली, सभा झाल्या. या सर्व कार्यक्रमापेक्षा शिवजयंती सर्वांची अस्मिता आहे. त्यामुळे राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला कोणताही नियम, अटी लावू नये, अशी मागणी सौदागर जाधव, राजाभाऊ मुंडे, नाना मालदार, इरफान सय्यद, जगदीश आंधळकर, पप्पू नाळपे, अशोक जाधव रजनीकांत जाधव, अमोल जाधव आदींनी केली आहे.