पुरुषोत्तम करवा
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : दूध हे आरोग्यासाठी लाभदायक आहे. गाय, म्हैस व शेळीच्या दुधाची विविध स्तरावर उपयुक्तता ठरवण्यात येते. यामुळे त्यांचे दरही वेगवेगळे पद्धतीने असतात. मात्र गाढविणीच्या दोन थेंब दुधाचा विविध आजाराला नियंत्रणात आणण्यासाठी उपयोग केला जात असल्याने या दुधाला दहा हजारांपर्यंत भाव मिळत आहे. असे असतानाही माजलगाव येथील राजाभाऊ भुजंगे हे माणुसकीच्या भावनेने मोफत दूध देताना दिसतात.
गाढव या प्राण्यास लोक वेगळ्या दृष्टीने पाहत असतात. परंतु याच गाढवाचा वापर पूर्वी व आताही विविध कामांसाठी केला जातो. हे गाढव वीटभट्टी, वाळू वाहतुकीसाठी, जत्रेला जाण्यासाठी, विविध घरगुती कामासह एका ठिकाणाहून इतर ठिकाणी जाण्यासाठी याचा वापर केला जात असे. गाढव पूर्वी केवळ भोई समाज पाळत असे. याच्या माध्यमातून ते विविध व्यवसायही करीत असत. अनेकजण इतर ठिकाणी जाण्यासाठी हे गाढव किरायाने घेऊन जात असत.
माजलगाव शहरात भोई समाजाचे ४०० घरं असून, सध्या बोटावर मोजण्याइतक्याच घरात ही गाढवं दिसून येत आहेत. पूर्वी यांच्या घरोघरी १० ते १५ गाढवं आढळून येत. गाढविणीच्या दुधाला पूर्वीपासूनच मागणी होती. हे दूध लहान मुलांच्या पोटातील आजारासाठी दिले जाते. त्याचबरोबर सर्दी, ताप, कफ, खोकला, पोट दुखणे, पोटसूळ आदी आजारांवर या दुधाचा वापर होत असे. यामुळे आजार तत्काळ गायब होत असत. असे जुने लोक आजही सांगतात.
सध्या गाढविणी पाळणारांची संख्या कमी झाल्याने त्यांचे दूध मिळणे मुश्कील झाल्याने या दुधाला चांगलाच भाव आला आहे. सध्या अनेक ठिकाणी हे दूध आठ ते दहा हजार रुपये लिटरप्रमाणे विकले जात आहे. परंतु माजलगाव शहरातील फुलेनगर भागात राहणारे राजाभाऊ गणपतराव भुजंगे हे वीटभट्टीवर मजुरीने काम करतात. यांच्याकडे असलेल्या गाढवांनादेखील चांगले काम मिळते. अनेकजण राजाभाऊ यांच्याकडे गाढविणीचे दूध घेण्यासाठी येतात. परंतु ते माणुसकीच्या भावनेने आजारी असणाऱ्या लहान मुलांना, व्यक्तीला मोफत दूध देताना दिसतात. या दुधाच्या माध्यमातून राजाभाऊ हे मोठी माया जमवू शकले असते. परंतु त्यांनी तसे न करता मेहनतीतून मिळणाऱ्या पैशातूनच उपजीविका भागवत आहेत.
-------
गाढवं चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय
गाढविणीच्या दुधाचे महत्त्व वाढल्याने अनेक वेळा त्यांची चोरी होत असते. सात-आठ वर्षांपूर्वी माजलगाव शहरातून २० गाढविणींची चोरी झाली होती. आता पुन्हा गाढवं चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे.
------
माझ्या आजोबाच्या काळापासून अनेक जण गाढविणीचे दूध विविध आजार झाल्यावर घ्यायला यायचे. आता गाढविणीचे दूध कोणी आजारी व्यक्तीसाठी मागायला आले तर त्यांना माणुसकीच्या भावनेतून मोफत वाटप करतो. परंतु अनेकजण गाढविणीच्या दुधाचा व्यवसाय करून पैसेही कमवतात.
- राजाभाऊ भुजंगे, माजलगाव
------
आयुर्वेदात गाढविणीच्या दुधाला खूप महत्त्व आहे. विविध आजारांवर याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. या दुधाचा अनेक जण व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायात नवीन पिढी उतरली तर याचा नक्कीच फायदा होणार आहे.
-सचिन सानप, पशुसंवर्धन अधिकारी, माजलगाव