- नितीन कांबळे
कडा ( बीड): देशसेवा पूर्ण करून जन्मभूमी सुरूर्डीपरतलेले सैन्यदलातील हवालदार सुखदेव वनवे यांचे गावात जंगी स्वागत करण्यात आले. हवालदार वनवे यांचे गावात आगमन होताच फटक्याची आतिषबाजी करण्यात आली. तर ग्रामस्थांनी खांद्यावर उचलून घेत पुष्पवृष्टीत वनवे यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. गावाचा सन्मान वाढविणाऱ्या हवालदार वनवे यांचे जंगी स्वागत करणे मोठ्या अभिमानाचे असल्याची भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.
आष्टी तालुक्यातील सुरूर्डी येथील सुखदेव नवनाथ वनवे हे दि. १६ जून २००५ रोजी सैन्यदलात हवालदार म्हणून भरती झाले. हवालदार वनवे यांनी सैन्य दलात तब्बल २० वर्ष इनामे इदबारे सेवा केली. उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लेह लद्दाख, राजस्थान, पंजाब, पश्चिम बंगाल, सिक्किम आदी राज्यात हवालदार वनवे यांनी देशसेवा दिली. आता सेवानिवृत झाल्यानंतर मायभूमीची सेवा करण्यासाठी हवालदार वनवे आष्टी तालुक्यातील सुरूर्डी येथे आले आहेत. बुधवारी हवालदार वनवे यांचे आगमन होताच ग्रामस्थ व युवकांनी एकत्र येत हवालदार वनवे यांचे फटाक्यांची आतिषबाजी व पारंपरिक नृत्य सादर करत जंगी स्वागत केले. काहींनी त्यांना खांद्यावर घेत मिरवणूक काढली. त्यानंतर सजवलेल्या चारचाकीत हवालदार वनवे यांची पत्नी,आई- वडिल यांच्यासह गावातून मिरवणूक काढण्यात आली.
महिलांनी केले औक्षणयावेळी गावातील महिला-भगिनींनी हवालदार सुखदेव वनवे यांचे औक्षण करत स्वागत केले. त्यांना साखर भरवून आनंद साजरा केला. यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, त्रिदल सेवा संघ, महाराष्ट्र राज्य पदाधिकारी आष्टी यांच्या वतीने हवालदार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आहे.