- नितीन कांबळेकडा (बीड) : कांदा भरण्यासाठी मजुरांना घेऊन निघालेल्या पिकअप वाहनाचे टायर फुटून झालेल्या अपघातात तिघाजणांचा मृत्यू तर १९ जण जखमी झाल्याची घटना कामगार दिनी कडा ते धामणगांव रोडवरील खोल ओढ्यात घडली होती. दरम्यान, यावेळी गंभीर जखमी झालेल्या १५ वर्षीय मुलीचा सात दिवसांनंतर उपचार सुरूअसताना मंगळवारी रात्री मृत्यू झाला. वैष्णवी बाळासाहेब नरवडे असे मृत मुलीचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील वंजारवाडी येथील पिकअप हिवरा येथे कांदा काढणीसाठी १ मे रोजी मजूर घेऊन जात असताना कडा-धामणगाव रोडवरील खोल ओढ्यात पिकअपचे समोरील टायर फुटून झालेल्या अपघातामध्ये दोन मुलीसह एका मुलाचा मृत्यू झाला होता.तर अन्य मजुर जखमी झाल्याची घटना घडली होती. गंभीर जखमी असलेल्या वैष्णवी बाळासाहेब नरवडे १५ वर्ष हिच्यावर अहिल्यानगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. सात दिवसांपासून उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री तिचा मृत्यू झाला. वंजारवाडी येथे बुधवारी दुपारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
असा झाला होता अपघातआष्टी तालुक्यातील वंजारवाडी येथील हर्षद महाजन हा गावातील २१ मजुरांना पिकअपमधून (क्रमांक एमएच ०१ एल २६८५) हिवरा येथे जात होता. कडा - धामणगाव रोडवर खोल ओढ्याजवळ येताच पिकअपचे टायर फुटले. त्यामुळे पिकअप पलटी होऊन ओढ्यात गेली. यामध्ये श्रावणी विक्रम महाजन (वय १४), अजित विठ्ठल महाजन (वय १४) ॠतुजा सतीश महाजन (वय १६) हे तीन मजूर ठार झाले तर १९ जखमी झाले होते. आता गंभीर जखमी वैष्णवी बाळासाहेब नरवडे हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने अपघातात मृतांची संख्या चार झाली आहे.
हे झाले होते जखमीशंकुतला नरवडे, सिंधुबाई महाजन, सखुबाई नरवडे, अंतिकाबाई महाजन, स्वाती महाजन, गीता महाजन, शांताबाई नरवडे, अर्चना नरवडे, कांता महाजन, हर्षल महाजन, पल्वली महाजन, शीतल नरवडे, नंदा नरवडे, राजश्री महाजन, मनीषा गोरे, हरिचंद महाजन, द्वारका महाजन हे जखमी झाले आहेत.