खतांच्या किंमतीत ३०० ते ४०० रूपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:35 AM2021-04-09T04:35:38+5:302021-04-09T04:35:38+5:30

अविनाश कदम आष्टी : कोरोना लॉकडाऊन अशा परिस्थितीमुळे संपूर्ण देशात व शेतकरी उदध्वस्त झालेला असताना आता केंद्र सरकारने रासायनिक ...

Fertilizer price hike by Rs 300 to Rs 400 | खतांच्या किंमतीत ३०० ते ४०० रूपयांनी वाढ

खतांच्या किंमतीत ३०० ते ४०० रूपयांनी वाढ

googlenewsNext

अविनाश कदम

आष्टी : कोरोना लॉकडाऊन अशा परिस्थितीमुळे संपूर्ण देशात व शेतकरी उदध्वस्त झालेला असताना आता केंद्र सरकारने रासायनिक खतांवरील अनुदान कमी केल्यामुळे सात एप्रिल पासून खतांच्या किंमतीमध्ये प्रति बॅग ३०० ते ४०० रुपये वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थ चक्राला मोठा दणका बसणार असून या दरवाढीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

इफको कंपनीने खतांच्या किंमती जाहीर केल्या. १८४६ डीएपी या खताच्या ५० किलो बॅगला आता १९०० रुपये मोजावे लागणार आहे. याआधी या बॅगची किंमत १३०० रुपये होती. तसेच १०:२६ :२६ या खताची किंमत १७७५ रुपये झाली असून यापूर्वी या खताची किंमत ११७५ रुपये होती. १५ :१५ या खताची किंमत पंधराशे रुपये प्रति बॅग झाली आहे. यापूर्वी या खताची किंमत १ हजार रुपये प्रति बॅग होती. १२: ३२ : १६ हे खत १२५० रूपयांना मिळत होते. आता या खताच्या बॅगला १८०० रुपये लागणार आहेत. २०: २० : ० खताची किंमत ९५० होती, ती आता १३५० रुपये झाली आहे.

काळाबाजार रोखण्याची गरज

तब्बल पाचशे ते सहाशे रुपये प्रमाणे खताच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळणार आहे अजून इतर कंपन्यांनी आपले दर जाहीर केलेले नाहीत. सध्या बाजारात जुन्या दराचे लाखो मेट्रीक टन खते गोदामामध्ये असून या सर्व खतांचा खत विक्रेत्यांकडून काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकरी संतप्त

गेल्या पंधरा वीस वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात खतांच्या किंमती कधीच वाढलेल्या नव्हत्या. रासायनिक खत उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्यास केंद्र सरकारने असमर्थता दाखवली त्यामुळे रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी खतात प्रचंड दरवाढ केल्याचे बोलले जात आहे. खतांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांत मात्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

आज इफ्को कंपनीचे नवीन खताचे दर पत्रक पाहिले बघून धक्काच बसला. खते महाग झाल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अडचणीचे होईल. खत वापराचे प्रमाण कमी होईल. परिणामी शेतकऱ्यांची उत्पादने कमी होतील. या दरवाढीचा मी निषेध करतो. -

कैलास आंधळे ,प्रगतशील शेतकरी आंधळेवाडी ता. आष्टी.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आयात होणारी खते बंद झाली आहेत. फॉस्फरिक ऍसिडच्या किमती जागतिक बाजारात गगनाला भिडल्याने ही दरवाढ अटळ आहे. केंद्र शासनाने योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अनुदान वाढवून द्यावे किंवा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात खताचे अनुदान जमा करावे म्हणजे खताचा काळाबाजार कमी होईल आणि हवे तेवढेच शेतकरी खताचा वापर करतील

-

अनिल मेहेर, अध्यक्ष, आष्टी तालुका खते बियाणे असोसिएशन.

Web Title: Fertilizer price hike by Rs 300 to Rs 400

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.