दिंद्रुड : दिंद्रुडसह परिसरातील देवदहीफळ, संगम, फ.जवळा, बाभळगाव परिसरात एक महिन्यापासून विद्युत पुरवठा सतत खंडित होत असून, थ्री फेज वीज पुरवठा फक्त दोन ते चार तासच राहतो. सिंगल फेजचा विद्युत पुरवठादेखील सतत खंडित होत आहे, तर अनेक गावातील सिंगल फेज डीपी नादुरुस्त असून, महावितरणचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत.
संगम, बाभळगाव, चाटगाव या गावामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून लाइनमन फिरकत नाही. पावसाने दडी मारल्याने पाणी असून, वीज पुरवठा सुरळीत नसल्याने परिसरातील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होत आहे.यासंदर्भात वेळोवेळी वीज कंपनी कार्यालयास खंडित विद्युत पुरवठ्याबद्दल कार्यालयास कळवूनही दखल न घेतल्याने १५ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी १२ वाजता विद्युत कार्यालयासमोर कोविड १९ चे सर्व नियम पाळत सरपंच तसेच ग्रामस्थ बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन महावितरण उपविभागीय कार्यालयास दिले आहे. या निवेदनावर श्रीधर ज्ञानोबा बडे ( सरपंच, देवदहीफळ),सतीश मिसाळ (सरपंच, फ.जवळा), भागवत साबळे ( उप-सरपंच फ.जवळा ),दत्तात्रय राजसाहेब लाटे ( सरपंच, बाभळगाव ), भगवान योगीराज कांदे ( सरपंच, संगम ) बळीराम गोवर्धन डापकर (माजी उपसरपंच, संगम ),सचिन रायकर, बालासाहेब केकाण ( उपसरपंच, चाटगाव ) गोविंद पांडुरंग केकाण, नानासाहेब रावसाहेब ठोंबरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.