बीड : घरासमोर दुचाकीचा हॉर्न का वाजवितो, असे विचारल्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याचे अपहरण करून त्याला टेकडीवर नेले. त्यानंतर बेल्टने मारहाण केली. तोंडवर, नाकावर बुक्यांनी मारहाण केली. हा प्रकार जूलै २०२४ मध्ये घडला होता. या मारहाणीचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला होता. आता नऊ महिन्यानंतर परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला लहान समजतो का, दादा म्हण, दादाची माफी माग, असे म्हणत या शेतकऱ्याला मारहाण केल्याचे व्हायरल व्हिडीओत दिसत आहे.
सचिन मुंडे, आदित्य गित्ते आणि सुमीत ऊर्फ बबलु बालाजी गित्ते (सर्व रा.नंदागौळ ता.परळी) अशी आरोपींची नावे आहेत. याच गावातील योगीराज अशोक गित्ते (वय ३२) या शेतकऱ्याने नऊ महिन्यानंतर फिर्याद दिली आहे. आदित्य व सचिन हे अनेकदा घरासमोरुन दुचाकीवरून ये-जा करताना हॉर्न वाजवायचे. एकेदिवशी त्यांची गाडी थांबवुन तुम्ही असे का करता, असे म्हणाल्यावर 'तुझ्या बापाचा रस्ता आहे काय, आम्ही काही पण करु. तु आमच्या नादी लागु नको नाहीतर तुझ्याकडे बघावे लागेल', असे म्हणून ते निघून गेले. २५ जूलै २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता योगिराज हे घरी जाताना नंदागौळ ते घाटनांदुर जाणारे रस्त्यावरील पाण्याचे टाकीजवळ आल्यावर आदीत्य गित्ते व सचिन विष्णु मुंडे हे दुचाकीवरून आले. योगिराज यांना अडवून त्यांची कॉलर पकडत दुचाकीवर बसवून विठ्ठल टेकडी येथे नेले. तेथे सुमीत हा होता. तेव्हा सचिन मुंडे आणि आदीत्य गित्ते यांनी 'तु ई माजलास का आम्हाला रस्त्यात थांबऊन दुचाकीवर रेस का करतो म्हणुन विचारतो का' असे म्हणुन दोघांनी शिवीगाळ करुन सचिन मुंडे याने बेल्टने पाठीवर, तोंडावर, पायावर आणि हातावर मारहाण करून जखमी केले. पुन्हा जर आमच्या नादी लागला तर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणुन योगिराज यांना तेथेच सोडुन ते निघुन गेले. तक्रार दिली तर ते पुन्हा मारतील, या भितीने उशिर झाल्याचे कारण योगिराज यांनी दिले आहे.
व्हिडीओ काढून लोकांना दाखवूसुमित याने सचिन व आदीत्य या दोघांना 'तुम्ही याला अजुन मारा मी याची व्हिडीओ शुटींग करतो ती आपण लोकांना दाखवु म्हणजे आपली दहशत होऊन सगळे आपल्याला घाबरतील' असे म्हणुन शुटींग चालु केल्याचेही तक्रारीत आहे.
आदित्यवर दुसरा गुन्हाआदित्य गित्ते याच्यावर दोन दिवसांपूर्वीच शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल आहे. यात तो अटकही आहे.
गुन्हा दाखल पात्रूडच्या गुन्ह्यात अपर पोलिस अधीक्षक यांना चौकशी करून गुन्हा दाखल करून घेण्याचे निर्देश दिले आहेत. परळीच्या गुन्ह्यातही आता तक्रार येताच गुन्हा दाखल केला आहे. यातील आदित्य हा पहिल्या गुन्ह्यात अटक आहे.- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड