बीड : महामार्गावर प्रवासी आणि वाहनधारकांना अडवून लुटणाऱ्या टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केला होता. यातील मुद्देमाल वसुलीसाठी जाताना पोलिसांनी 'फिल्मीस्टाइल' कारवाई केली. आधी गुन्हेगारी वस्तीची ड्रोन कॅमेराद्वारे रेकी केली. त्यानंतर १०० पोलिसांनी चोहोबाजूने घेरत अचानक छापा मारला. तासभर घराची झडती घेऊन लुटलेले ११ तोळ्यांचे दागिने आणि रोख रक्कम असा १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई धाराशिव जिल्ह्यातील खामकरवाडीत सोमवारी दुपारी ४ ते ५ या वेळेत केली.
जिल्ह्यातून जाणाऱ्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर मागील काही दिवसांपासून लूटमारीच्या घटना वाढल्या होत्या. चार गुन्हेही दाखल झाले होते. त्यामुळे प्रवाशांसह वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण होते. याच अनुषंगाने बीड पोलिसांनी एलसीबीचे विशेष पथक तयार करत शोध मोहीम सुरू केली. सीसीटीव्ही व खबऱ्यांचा आधार घेत दोन दिवसांपूर्वी अनिल काळे या कुख्यात गुन्हेगारासह त्याचे राहुल काळे आणि विकास काळे हे दोन मुलगे यांना पकडले होते. येथेही पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले होते. कारचा काच उघडत नसल्याने काचा फोडून पोलिसांनी चोरट्यांना बाहेर काढले होते. यात तीन पोलिस कर्मचारी जखमीही झाले होते. त्यांच्याकडून चार गुन्हे उघड झाले होते. यातील मुद्देमाल हस्तगत करण्यासाठीच सोमवारी दुपारी बीड पोलिसांनी धाराशिव पोलिसांच्या मदतीने सापळा लावला होता. तासभर मोहीम हाती घेत पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त केला.
या पथकाने केली कामगिरीही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, गेवराईचे किशोर पवार, सपोनि पवार, पोलिस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलिस अंमलदार सोमनाथ गायकवाड, मनोज वाघ, अशोक दुबाले, राहुल शिंदे, बाळू सानप, अर्जुन यादव, अंकुश वरपे, विकी सुरवसे, मनोज परजणे, अश्फाक सय्यद, नितीन वडमारे यांनी केली.
आरसीपीसह १०० पोलिसांनी घेरली वस्तीवाशी तालुक्यातील खामकरवाडीत बहुतांश लोक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. पोलिस गेल्यावर त्यांच्यावर हल्ला केला जातो. त्यामुळेच बीड पोलिसांनी काळजी घेत आरसीपीच्या विशेष तुकडीसह १०० पोलिसांची फौज घेऊन वस्तीला वेढा घातला होता. सोबतच ड्रोनचीही मदत घेण्यात आली. जर एखादा आरोपी पळून गेला तर त्याचा ड्रोनद्वारे पाठलाग केला जाणार होता. त्यांच्या पाठलागासाठी विशेष बंदोबस्तही राखीव होता. येरमाळा पोलिसांचीही यात मदत झाली.
किचनमधील डब्यात लपवले दागिनेअनिल काळे हा नाटकं करत असल्याने त्याला कोठडीतच ठेवले होते. त्याची दोन मुले राहुल आणि विकासला घेऊन पोलिस वस्तीत गेले होते. त्यांनी सुरुवातीला मुद्देमाल देण्यास विरोध केला; परंतु खाक्या दाखविताच त्याने किचनमधील एक डब्बा दाखविला. तो उघडल्यानंतर त्यात मनी मंगळसूत्र, गंठन, सोन्याची चैन व रोख असा १४ लाख रुपयांचा मुद्देमाल आढळला. पोलिसांनी पंचांसमोर तो जप्त केला. घरात दोघांचीही आई होती आणि 'माझ्या मुलांना सोडा', अशी विनवणी ती करत होती.
हे तिघे ताब्यात, तर तिघे फरारपोलिसांनी लुटमारीच्या प्रकरणात राहुल अनिल काळे (वय १९), विकास अनिल काळे (वय २१), अनिल राम काळे (वय ४०, रा. खामकरवाडी, ता. वाशी, जि. धाराशिव) या तिघा बापलेकांना ताब्यात घेतले आहे. त्यांचे साथीदार सुनील हिरमण दशांदे, सचिन ऊर्फ आवड्या राम काळे आणि बबलू शिव दशांदे (सर्व रा. मकरवाडी) हे अजूनही फरार आहेत. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.
Web Summary : Beed police, using drone surveillance, raided a criminal den in Dharashiv, recovering ₹14 lakh in stolen jewelry and cash. Three suspects were arrested after a series of highway robberies, while a search for three accomplices continues.
Web Summary : बीड पुलिस ने ड्रोन से निगरानी कर धाराशिव में एक अपराधी ठिकाने पर छापा मारा और 14 लाख रुपये के चोरी के गहने और नकदी बरामद की। राजमार्ग पर डकैती की घटनाओं के बाद तीन संदिग्धों को गिरफ्तार किया गया, जबकि तीन साथियों की तलाश जारी है।