बीड : दिव्यांग प्रमाणपत्राच्या नोंदणीसाठी आलेल्या दिव्यांग व्यक्तींचा जिल्हा रुग्णालयात अपमान केला जात आहे. त्यांना सुविधा देणे तर दूरच, साधी बसण्याचीही व्यवस्था नाही. पहाटेपासूनच रांगा लावून दिवसभर जमिनीवर बसत प्रतीक्षा करावी लागत असून, अन्न, पाण्याविना ताटकळावे लागत आहे. केवळ अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे दिव्यांगांचे हाल होत असल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे.
जिल्हा रुग्णालयात प्रत्येक बुधवारी दिव्यांगांचा बोर्ड असतो. या एकाच दिवशी दिव्यांग नोंदणी, तपासणी आणि प्रमाणपत्र देण्याचा पायंडा येथील अधिकाऱ्यांनी पाडलेला आहे. त्यामुळे या एकाच दिवशी जिल्हाभरातील दिव्यांग व्यक्ती फरपटत रुग्णालयात येतात; परंतु येथे आल्यानंतर त्यांना कसल्याच सुविधा मिळत नसल्याचे समोर आले आहे. एकीकडे शासनाकडून दिव्यांगांना राखीव जागा आहेत. अगदी बसमध्येदेखील त्यांना स्वतंत्र बसण्याची व्यवस्था आहे. त्यांना ठिकठिकाणी सन्मानही दिला जातो; परंतु जिल्हा रुग्णालय याला अपवाद आहे. येथे सन्मान तर दूरच, तासन्तास बसवून त्यांचा अपमान केला जात आहे. त्यांना पाणी, बसण्याची व्यवस्था नसल्याचे बुधवारी दिसून आले. हा सर्व प्रकार समोर दिसत असतानाही जिल्हा शल्यचिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे या अधिकाऱ्यांविराेधात रोष व्यक्त होत आहे. वेळीच सुविधा आणि कामे वेळेत पूर्ण न केल्यास काही दिव्यांगांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
नोंदणीसाठी एकमेव कर्मचारी
एका दिव्यांगाची नोंदणी करण्यासाठी किमान पाच मिनिटे लागतात. त्यातही अनेकदा वेबसाइटमध्ये अडचणी असतात. त्यामुळे वेळ लागतो, तसेच त्यांच्या नोंदणीसाठी किमान दोन टेबल आवश्यक आहेत; परंतु बुधवारी एकच होता. दुसरा कर्मचारी आलाच नाही. एका ठिकाणी नोंदणी करताना दिव्यांगांना दिवसभर प्रतीक्षा करावी लागली.
घरी बसून प्रमाणपत्र तयार?
दिव्यांगांना एका चक्करमध्ये नोंदणी, तपासणी आणि प्रमाणपत्र कधीच दिले जात नाही. येथील अधिकारी हे ठराविक डॉक्टरांना हाताशी धरून घरीच प्रमाणपत्र तयार करीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. एका प्रमाणपत्रासाठी 'आर्थिक' उलाढालही मोठी होत आहे. याबाबत यापूर्वीही तक्रारी झाल्या आहेत; परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही.
दिव्यांग बोलण्यास घाबरतात का?
याबाबत काही दिव्यांग व्यक्तींशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी आपल्या कामात हे डॉक्टर, अधिकारी खोडा घालतील, या भीतीने अनेकांनी बोलण्यास टाळले. या दिव्यांगांना स्वत:च्या ‘सुखा’साठी अप्रत्यक्ष धमक्याही देण्याचा प्रकार येथे केला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
सीएसचे पहिले पाढे पंचावन्न
या सर्व प्रकाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांना बुधवारी सायंकाळच्या सुमारास भ्रमणध्वणीवरून संपर्क केला; परंतु त्यांनी नेहमीप्रमाणेच फोन घेतला नाही. जिल्हा रुग्णालयातील गलथान कारभार चव्हाट्यावर येत असल्याने माध्यमांपासून दूर पळण्याचा प्रयत्न हे अधिकारी करीत आहेत. डॉ. गित्ते यांनी फोन न घेतल्याने त्यांचे पहिले पाढे पंचावन्न बुधवारीही सुरूच होते.
===Photopath===
030321\032_bed_24_03032021_14.jpeg~030321\032_bed_23_03032021_14.jpeg
===Caption===
आपली कोणीही दखल न घेतल्याने एका वृद्धाने जमिनीवरच अंग टाकले. त्याच्याजवळून सर्व डॉक्टर, अधिकारी गेले, परंतू साधी हटकण्याची तसदीही कोणी घेतली नाही.~जिल्हा रूग्णालयात दिव्यांग नोंदणीसाठी जमिनीवर बसलेले दिव्यांग महिला, पुरूष...