बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून भाजपचे आ.सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आ.प्रकाश सोळंके यांनी महायुतीचेच मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांची कोंडी केली होती. यामुळे मुंडेंना राजीनामाही द्यावा लागला होता. त्यांची जागा आपल्याला मिळेल, अशी आशा धस व सोळंकेंना होती; परंतु पक्षाने पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनाच संधी दिल्याने या दोघांच्याही आशेवर पाणी फेरले आहे. शिवाय आता जिल्ह्यातील एकमेव पंकजा मुंडे याच मंत्री असणार आहेत.
९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या झाली. यात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराडचा सहभाग आढळला. यावरूनच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी धनंजय मुंडेंना कोंडीत पकडले. राष्ट्रवादीचे आ.प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर भाजपचे आ.सुरेश धस यांनी वेगवेगळे गंभीर आरोप केले. करुणा शर्मा यांनीही अनेक मुद्दे मांडले. या सर्व कोंडीत अडकल्याने धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. हीच जागा आपल्याला मिळेल, अशी आशा आ.धस आणि आ.प्रकाश सोळंके यांना होती; परंतु राष्ट्रवादीने या दोघांनाही बाजूला करत छगन भुजबळ यांना संधी दिली आहे. त्यामुळे या दोघांसह त्यांच्या समर्थकांचा हिरमोड झाल्याचे दिसत आहे.
बीडला पहिल्यांदाच दोन कॅबिनेट मंत्रीमहायुतीच्या या सरकारमध्ये पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्या रूपाने पहिल्यांदाच बीडला आणि त्यातही परळीला दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली होती. अनेकांनी वेगवेगळ्या पक्षात असले तरी एकाच घरात दोन मंत्रिपदे दिल्याने आरोप केले होते; परंतु याची कोणीही दखल घेतली नव्हती; परंतु काही दिवसांनी धनंजय यांचे पद गेले आणि जिल्ह्यात एकमेव पंकजा यांच्या रूपाने कॅबिनेट मंत्री पद राहिले.
पंकजा मुंडे - सुरेश धस संघर्षविधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी बंडखोर उमेदवार माजी आ.भीमराव धोंडे यांचा प्रचार केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता. अंगाला गुलाल लागताच धसांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. तो संघर्ष आजही कायम असल्याचे पाहायला मिळते. दोघेही भाजप पक्षात आहेत.
धनंजय मुंडे - प्रकाश सोळंके संघर्षदेशमुख हत्या प्रकरणावरून आ.प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी पहिली मागणीही त्यांनीच केली. त्यानंतर वाल्मीक कराडच जिल्हा चालवत होता, असा आरोपही केला होता. दोघेही राष्ट्रवादीतच आहेत.
छगन भुजबळ यांची लॉटरीधनंजय मुंडे यांचे पद गेल्यानंतर ते बीडलाच मिळेल आणि त्यातही आ.सुरेश धस आणि आ.प्रकाश सोळंकेच दावेदार समजले जात होते. दोघेही यापूर्वी मंत्री राहिलेले आहेत; परंतु त्यांनीच वेगवेगळे आरोप केल्याने त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे विजयराजे पंडित आणि भाजपच्या नमिता मुंदडा यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली होती; परंतु राष्ट्रवादीने या सर्वांचाच पत्ता कट करत छगन भुजबळ यांना मंत्री केले. या सर्वांच्या वादात भुजबळ यांची लॉटरी लागली आहे.