बीड : बीडमध्ये बंजारा समाजाचा सोमवारी दुपारी मोर्चा निघाला. या मोर्चात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. धनंजय मुंडे यांनी 'वंजारा आणि बंजारा एकच आहोत' असे वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. बंजारा समाजातील कार्यकर्त्यांनी याचा तीव्र निषेध करत बंजारा आणि वंजारा वेगवेगळे असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
बीड शहरात एसटी आरक्षणासाठी सोमवारी दुपारी बंजारा समाजाचा विराट मोर्चा निघाला. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आ. धनंजय मुंडे यांनी, भाषण करताना 'वंजारा-बंजारा एक आहोत' असे वक्तव्य केले. यावर संतप्त प्रतिक्रिया उमटली. १९९४ मध्ये तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे यांनीही असेच विधान करून बंजारा समाजाचे २.५ टक्के आरक्षण हिरावून घेतल्याचा आरोप बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला.
त्यांनी म्हटले, "बंजारा आणि वंजारी’ या दोन वेगवेगळ्या जमाती आहेत. आमची बोलीभाषा, राहणीमान आणि संस्कृती पूर्णपणे वेगळी आहे. बंजारा समाज खूप हुशार आणि प्रामाणिक आहे, आणि आम्ही धनंजय मुंडे यांचा डाव नक्कीच हाणून पाडू. त्यांनी आपले वक्तव्य तात्काळ मागे घ्यावे, ही बंजारा समाजाची कळकळीची विनंती आहे. तुम्ही परत तो खेळ करू नका. बंजारा-वंजारा एक नाहीत, दोन्ही वेगवेगळ्या संस्कृती आणि भाषा आहेत. आम्ही आमच्या हक्काचे मागतोय, त्यात तुम्ही हस्तक्षेप करू नये, असेही आंदोलनानंतर काही कार्यकर्त्यांनी सांगितले. मुंडे यांच्या वक्तव्यामुळे बंजारा समाजात संतापाचे वातावरण असून, मुंडे यांनी जाहीरपणे माफी मागून आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.