अंबाजोगाई : तालुक्यात अनेक ठिकाणी पुलांना बसविण्यात आलेले लोखंडी कठडे गायब झाले आहेत. अनेक मद्यपी अथवा चोरट्यांनी पुलाला बसवलेल्या लोखंडी पाईप तोडून भंगारमध्ये विकल्या आहेत. त्यामुळे पुलाचे कठडे गायब झाले आहेत. यापूर्वीही कठडे नसलेल्या पुलांवर अनेक वाहनचालक पडलेले आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी पुलांना कठडे बसवावेत, अशी मागणी होत आहे.
रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीची मागणी
पाटोदा : शहरासह ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांची मोठी दुरवस्था झालेली दिसून येत आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडत असून, दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. संबंधित विभागाकडून दुरुस्ती मात्र काही होत नसल्याचे दिसत आहे.
दलालांचा सुळसुळाट, सामान्यांचे हेलपाटे
वडवणी : सामान्यांची कामे तातडीने व्हावीत, त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येते. मात्र, वडवणी तहसील कार्यालयात दलालांची मोठी गर्दी वाढल्याने सामान्य माणसाला साध्या कामासाठीही हेलपाटे मारावे लागतात. तालुक्यातील नागरिकांची पिळवणूक होत आहे.
बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा
अंबाजोगाई : शहरात सावरकर चौक, प्रशांतनगर, शिवाजी चौक या भागात असणाऱ्या चहाच्या टपऱ्यांसमोर चहा पिण्यासाठी आलेले ग्राहक आपल्या दुचाकी गाड्या बिनधास्त रस्त्यावर लावून टपऱ्यावर चहा पीत बसतात. गाड्या रस्त्यावर लावण्यात येत असल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. बेशिस्त पार्किंग, समोर असणारे हातगाडे यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते.
गॅस सिलिंडरची नियमबाह्य वाहतूक
अंबाजोगाई : घरगुती तथा व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा अंबाजोगाई तालुक्यात काही लोकांनी गोरखधंदा सुरू केला आहे. अंबाजोगाई शहरातून स्वत:च्या नावावर गॅस घेऊन त्या सिलिंडरची विक्री चढ्या भावाने व्यावसायिकांना केली जाते. हा प्रकार सातत्याने सुरू आहे. हे सिलिंडर प्रवास करणाऱ्या ऑटोद्वारे इतरत्र नेऊन विकली जातात. पुरवठा विभागाने या प्रकाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
दारूची विक्री बंद करण्याची मागणी
आष्टी : तालुक्यात ठिकठिकाणी अवैध दारू बनविली जाते. यामुळे अनुचित प्रकार घडत आहेत. अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी दारूबंदीची मागणी महिलांसह नागरिकांनी केली आहे. मात्र, याकडे अद्यापही दुर्लक्षच होत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. याबाबत पावले न उचलल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशांतनगर परिसरात वाहतूक कोंडी
अंबाजोगाई : शहरातील सावरकर चौक ते सायगाव नाका या प्रशांतनगर परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. या रस्त्यावर खासगी रुग्णालये व व्यापारपेठ असल्याने वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरच पार्क केली जातात, तसेच या परिसरात सातत्याने कोणाचे ना कोणाचे बांधकाम सुरू असल्याने बांधकामाचे साहित्य रस्त्यावरच पडलेले असते. या परिसरात वाहतूक पोलिसांची संख्या वाढवून वाहतुकीची कोंडी दूर करावी, अशी मागणी होत आहे.