Walmik Karad Beed: पवनचक्की खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर काल त्याला एसआयटीच्या ताब्यात देण्यात आले. कराडला आज एसआयटीने बीड कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने कराडला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे कराडला किमान पुढचा आठवडाभर तरी जामिनासाठी अर्ज करता येणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.
"वाल्मीक कराडच्या संपत्तीबाबत चौकशी सुरू आहे. तसंच आरोपींना फरार होण्यास कोणी मदत केली, याचाही शोध घ्यायचा आहे," असं सांगत एसआयटीकडून वाल्मीक कराडच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. तर दुसरीकडे, अटकेत असलेल्या एकाही आरोपीने वाल्मीक कराडचं नाव घेतलेलं नाही, त्यामुळे खुनाच्या गुन्ह्यात कराडच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही, असा प्रतिवाद कराडच्या वकिलांकडून करण्यात आला. कोर्टाने दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर वाल्मीकला २२ जानेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, "वडिलांची हत्या करणाऱ्यांविरोधात मकोका लावून ३०२ मध्ये त्यांचा समावेश करावा," अशी मागणी देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने केली. तपास योग्य दिशेने चालू असल्याचे एसआयटी प्रमुखांनी सांगितल्याचे भाऊ धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.