शिरूर कासार (जि. बीड) : आपणास काहीच त्रास नसताना पाॅझिटिव्ह म्हणून कोरोना सेंटरमध्ये ठेवले, असा गैरसमज धरून तब्बल २२ रुग्णांनी गुपचूप पलायन केले. ही घटना शिरूर येथील शासकीय कोरोना केअर सेंटरमध्ये उघडकीस आली. यानंतर येथील सेंटरचे प्रमुख डॉ. विजय राठोड यांनी शनिवारी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.शिरूर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक ठिकाणी नागरिकांची अँटिजन तपासणी करण्यात येत आहे. या दरम्यान, अनेक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. या रुग्णांना उपचारासाठी शासकीय वसतिगृहात सुरू असलेल्या कोविड सेंटरमध्ये दाखल केले होते. १४ ते २१ मेच्या दरम्यान, या सेंटरमधून आळीपाळीने तब्बल २२ कोरोनाबाधितांनी पळ काढल्याचे निष्पन्न झाले. यानंतर कोविड सेंटरचे डॉ. विजय राठोड यांनी शनिवारी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या रुग्णांमुळे कोरोनाच्या प्रसाराची भीती वाढली आहे.
Coronavirus: २२ रुग्णांनी कोविड सेंटरमधून काढला पळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 08:13 IST