केज ( बीड) : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या प्रकरणाचा तपास खोलात जाऊन करत सर्व आरोपींसह मुख्य सूत्रधाराला अटक करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांचे सांत्वन केल्यानंतर केली.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या गंभीर प्रश्नाची बाजू खा. बजरंग सोनवणे आणि खा. निलेश लंके यांनी देशाच्या संसदेत मांडली. तर विधानसभेत आ. संदीप क्षीरसागर, आ. जितेंद्र आवाड यांनी मांडली आहे. शासनाने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमून न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खोलात तपास करून सर्व आरोपींसोबत त्यांच्या मुख्य सूत्रधारालाही अटक करा. मोबाईल कॉलची तांत्रिक माहिती काढून कोणाशी संवाद साधला हे पहावे, त्यानंतर या प्रकारणातील वस्तुस्थिती सर्वांच्या समोर येईल, असेही शरद पवार म्हणाले.
यावेळी खा बजरंग सोनवणे, खा निलेश लंके, आ संदीप क्षीरसागर यांनी ही आपल्या भावना व्यक्त करून सर्व आरोपींना अटक करून त्यांच्या मास्टरमाईंडचा शोध घेण्याची मागणी केली. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, जीवनराव गोरे, माजी आमदार प्रा संगीता ठोंबरे, पृथ्वीराज साठे, उषा दराडे, सय्यद सलीम, साहेबराव दरेकर, मोहन जगताप यांच्यासह डॉ. नरेंद्र काळे, राजेसाहेब देशमुख, मेहबूब शेख, अॅड. हेमा पिंपळे, गणेश वरेकर, परमेश्वर सातपुते, राजेंद्र मस्के, नारायण डक, बलभीम डाके, रत्नाकर शिंदे यांचेसह जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते हजर होते.
सामूहिक प्रयत्न केल्यास दहशतीला आळा बसेल..बीड जिल्ह्यात पसरलेल्या दहशतीच्या वातावरणाला सामूहिक प्रयत्नाची भूमिका घेतल्यास आळा बसेल. त्यासाठी एकीचे बळ दाखविण्याचे आवाहन, शरद पवार यांनी केले.
मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली..मस्साजोग येथे आल्यानंतर शरद पवार यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत धीर दिला. सरपंच देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. यापुढे ही मुले बारामती येथील विद्या निकेतन येथे त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षण घेतील, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.