लोकमत न्यूज नेटवर्कधारूर : जायभायवाडी येथे बालविवाह करायचा नाही असा निधार ग्रामस्थांनी केला. ‘जायभायवाडीतील ऊसतोड कामगाराच्या अल्पवयीन मुलीचा विवाह रोखल्याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित झाल्यानंतर शांतीवन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक नागरगोजे यांनी जायभायवाडी या गावाला भेट दिली. तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानंतर ग्रामस्थांनी हा एखमुखी निर्णय घेतला. बालविवाह रोखलेल्या मुलीला शिक्षणासाठी दत्तक घेत असून तिच्या लग्नाची जबाबदारी उचलत असल्याचे नागरगोजे यावेळी म्हणाले.जायभायवाडी ऊसतोड मजुराच्या मुलीचा होणारा बालविवाह ग्रामपरिवर्तक जालिंदर वनवे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने रोखला होता. ही बाब पत्रकार अनिल महाजन यांनी नागरगोजे यांना कळविली होती. दीपक नागरगोजे यांनी जायभायवाडीतील ऊसतोड कामगारांशी संवाद साधला. येथील सर्व मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही तसेच बालविवाहाला बळी पडू नये म्हणून गावातील सर्व मुलींच्या शैक्षणकि पालकत्वाची जबाबदारी शांतीवन घेईल असा शब्द नागरगोजे यांनी दिला. तसेच ज्या मुलीचा बालविवाह थांबविण्यात आला, तिच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतची सर्व जबाबदारी शांतीवन घेत असल्याचे सांगितले.ज्या दिवशी मुलगी शांतीवन संस्थेत दाखल होईल त्याच दिवशी तिच्या नावाने २५ हजार रुपयांची बचत ठेव संस्थेच्या वतीने ठेवली जाईल, असा शब्दही नागरगोजे यांनी यावेळी दिला.यावेळी जमलेल्या ऊसतोड कामगारांना त्यांनी मार्गदर्शन केले. गावामध्ये पाणी जर असेल तर आपणाला आपल्या शेतामध्ये पिके चांगली घेता येतील व ऊसतोडणीसाठी स्थलांतरसुद्धा करावे लागणार नाही. आपल्या पाल्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका. परिवर्तनासाठी पाणी आणि शिक्षण या दोन बाबी लक्षात ठेवल्या तर आपलं गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असेही ते म्हणाले.यावेळी गावातील सर्व महिला व पुरुष, मुले, मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सरपंच डॉ.सुंदर जायभाये यांनी गावामध्ये सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. प्रास्ताविक ग्रामपरिवर्तक जालिंदर वनवे यांनी केले. श्रमातून पाणीदार झाल्यानंतर जायकवाडीने शैक्षणिक विकासाची वाट धरली असून,या पुढे गावात बालविवाह केला जाणार नाही, असा एकमुखी निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला.
‘जायभायवाडीत बालविवाह करणार नाही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:20 IST