परळी : शहरातील जलालपूर रोडवरील एका मंगल कार्यालयात मल्टीस्टेट व पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या अडीअडचणी, व्यथा ऐकण्यासाठी भाजपचे आमदार सुरेश धस हे शनिवारी दुपारी आले असताना त्यांना काळे झेंडे दाखवीत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मंत्री धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांच्या विषयी चुकीचे आरोप करत व परळीला बदनाम करीत असल्याचे म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चले जाव, सुरेश धस चले जाव अशा घोषणा देत आमदार धस यांचा निषेध नोंदविला. तसेच असाच प्रकार सिरसाळा येथे देखील घडला असून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत धस यांचा निषेध केला. दरम्यान, काळे झेंडे दाखविल्याप्रकरणी पोलिसांनी परळी शहरात पाच तर सिरसाळा येथे तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
राजस्थानी मल्टीस्टेट परळी, राजस्थानी पतसंस्था, परळी व ज्ञानराधा मल्टीस्टेट व इतर मल्टीस्टेटच्या ठेवीदाराचे करोडो रुपये अडकले आहेत. या प्रश्नी ठेवीदार कृती समिती ची बैठक शहरातील जलालपूर रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात शनिवारी दुपारी आयोजित करण्यात आली .या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी आमदार सुरेश धस आले होते. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंडे - कराड समर्थक असलेल्या काही कार्यकर्त्यांनी आमदार सुरेश धस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी लागलीच पाच जणांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आमदार सुरेश धस यांनी जातिवाद निर्माण केला आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्या बाबतीत आरोप करीत परळी शहराची बदनामी केली आहे. त्यामुळे आमदार धस यांचा काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला, असे परळीचे माजी उपनगराध्यक्ष सुनील फड, कार्यकर्ते सुरेश गीते यांनी सांगितले.
दरम्यान, परळीचा दौरा आटपून आमदार धस सिरसाळा मार्गे रवाना होत होते. सिरसाळा येथील चौकात आमदार सुरेश धस यांच्या गाड्यांचा ताफा आला असताना काही कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले यावेळी स्कॉटिंगच्या गाडीत असलेल्या परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मझहर सय्यद व पोलीस नाईक विष्णू घुगे, सुनील अन्नमवार व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरखनाथ दहिफळे यांनी दिली.
दहा-बारा कार्यकर्त्यांनी झेंडे दाखवलेलोकशाहीमध्ये काळे झेंडे दाखवण्याचा अधिकार आहे. दहा-बारा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले त्यामुळे काही फरक पडत नाही. मल्टीस्टेट ठेवीदारांच्या बैठकीला तीनशे लोक आले होते या ठिकाणी आपण ठेवीदारांच्या सोबत आहोत. - आमदार सुरेश धस
संचालकांची मालमत्ता जप्त कराराजस्थानी मल्टीस्टेटच्या ठेवीदारांची अडकलेले कोट्यावधी रुपये ठेवीदारांना परत मिळाले पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. फसवणूक केल्याप्रकरणी चेअरमन चंदुलाल बियाणी अटक आहेत. परंतु बाकीचे संचालक फरार आहेत. या संचालकांना एका शाळेतून पैसे पुरविले जात आहेत. संचालकांची व नातेवाईकांची संपत्ती सीझ करून ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन आमदार धस यांनी ठेवीदारांच्या बैठकीत दिले. यावेळी राजेसाहेब देशमुख, सचिन उबाळे, सेवकराम जाधव, केशवराव मुंडे यांच्यासह परळी व परिसरातील ठेवीदार उपस्थित होते.