शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

पावसाळ्यात सापांपासून सावध रहा; बीड जिल्ह्यात विषारी सापांच्या केवळ सहा प्रजाती! - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:23 IST

अविनाश मुडेगावकर लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सापांचा नागरी वस्तीत वावर मोठ्या प्रमाणात वाढत असतो. ...

अविनाश मुडेगावकर

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सापांचा नागरी वस्तीत वावर मोठ्या प्रमाणात वाढत असतो. अशा परिस्थितीत पावसाळ्यात घरात साप शिरणार नाही, याची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. बीड जिल्ह्यात अनेक विषारी साप आढळत असले तरी जिल्ह्यात आढळणाऱ्या सापांच्या विविध जातींपैकी निमविषारी सापांची संख्या जास्त आहे. नागरिकांनी खबरदारी घेतल्यास व मनात भीती न बाळगल्यास सर्पदंश झाल्यावरदेखील योग्य उपचारांमुळे व माहितीमुळे अनेकांचे जीव वाचू शकतात.

बीड जिल्ह्यात आढळणाऱ्या सापांमध्ये केवळ सहा साप हे विषारी आहेत. त्यातही आपल्या भागात वावरणारे फक्त चार प्रजातींचे साप विषारी आहेत. त्यात नाग, घोणस, मण्यार, पोवळा यांचा समावेश आहे. त्यांची ओळख पटली की बाकी सगळे माणसाचा जीव घेतील इतके धोकादायक नाहीत. विषारी सापांचा सर्पदंश झालाच तरी सर्पदंशावर प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध असल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही. सर्पदंश झाल्यावर प्राथमिक उपचार केल्यास व काही वेळात संबंधिताला रुग्णालयापर्यंत पोहोचवून उपचार मिळाल्यास विषारी सापाचा दंश असला तरी रुग्ण बचावू शकतो.

....

पावसाळ्यातच का आढळतात साप?

पावसाळा सुरू झाला आहे. तरीदेखील पावसाळ्याचे सुरुवातीचे काही दिवस ऊन, पावसाचा खेळ सुरू असतो. उन्हाळ्यात खूप ऊन पडल्यामुळे साप हे थंड आणि दमट जागा शोधतात. त्यामुळे साप हे मानवी वस्तीत भक्ष्य आणि आसरा शोधण्यासाठी येतात. उन्हाळ्याच्या अखेरीस काही सापांचा प्रजननाचा काळ सुरू होत असतो. त्यामुळे एकाच ठिकाणी दोन ते तीन सापदेखील आढळतात.

...

बिनविषारी साप

बीड जिल्ह्यात प्रामुख्याने कवड्या, गवत्या, विरोळा, दिवड्या, नानेटी, चित्रक, तस्कर, धामण, अजगर, रुखई, धूळनागीण, वाळा, मांडूळ, डुरक्या घोणस, खापरखवल्या, काळडोक्या असे २० पेक्षा जास्त बिनविषारी साप सापडतात.

.....

बीड जिल्ह्यात आढळणारे विषारी साप

पोवळा : सापाचे शास्त्रीय नाव येट्राफाय फॉलिओफीस मेलेनुरूस आहे. लांबट-सडपातळ शरीर, शेपूट आखूड, डोक्यावर दोन पांढऱ्या रंगाचे ठिपके आणि शेपटीखालील गुद्‌द्वारापासून टोकापर्यंत त्वचा आकाशी रंगाची व त्यावर काळे ठिपके असतात. हा साप भीती दाखविण्यासाठी शेपटी गोल करून तांबूस-नारिंगी भाग दर्शवितो. त्याची लांबी ही सरासरी १४ इंच असते.

नाग (कोब्रा) : नागाला ओळखण्याची सर्वांत मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. नागाच्या डोक्यामागील काही बरगड्या अतिशय लवचिक असतात. त्यामुळे नागाला फणा काढणे शक्य होते. नागाचा फणा काढण्याचा अर्थ म्हणजे संकटकाळी आपली छबी मोठी करून समोरील प्राण्यांना घाबरविणे.

घोणस : घोणसला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याच्या अंगावरील साखळीसारख्या दिसणाऱ्या तीन समांतर रेषा असतात. घोणस हिरवा, पिवळा, हलका, करडा रंग व इतर अनेक रंगछटांमध्ये आढळतात. घोणसाचे फुत्कार एखाद्या कुकरच्या शिट्टीप्रमाणे असतात. घोणसाचे विष अतिशय जहाल असते.

मण्यार : घराच्या जवळपास, बागेत, गवतात, झुडपात, पडक्या इमारतीत मण्यार आढळतो. तो मुख्यतः निशाचर आहे. अन्न शोधण्यासाठी तो रात्री हिंडतो. तो दिवसा सहजासहजी बाहेर पडत नाही. लहान साप हे त्याचे मुख्य भक्ष्य असून उंदीर, पाली, सरडे व बेडूक यांसारखे लहान प्राणी तो खातो. मण्यार आपल्या भागातील सर्वांत विषारी साप समजला जातो.

....

साप समोर दिसल्यास काय करावे?

साप समोर दिसल्यास घाबरू नये. शांतपणे सापाला त्याच्या वाटेने जाऊ द्यावे. आपल्या हालचालीने साप घाबरतो. स्वतःच्या बचावासाठी आक्रमण करतो. साप घरात असेल तर त्याच्यावर दुरून लक्ष ठेवावे. सापाला न मारता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना अथवा सर्पमित्रांना फोन करावा. सापाला मारण्याचा प्रयत्न करू नये. साप मारण्याच्या प्रयत्नात आपला जीव जाण्याचा धोका असतो.

- हेमंत धानोरकर, सर्पमित्र, अंबाजोगाई.

....

साप चावल्यास काय करावे ?

साप चावल्यास घरगुती उपचार न करता त्या व्यक्तीस तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे. बऱ्याच वेळा साप चावल्यानंतर त्या व्यक्तीचे हात अथवा पाय घट्ट बांधले जातात. तसे न करता जिथे जखम झाली तो भाग स्वच्छ धुऊन घ्यावा. रुग्णालयात विषारी साप चावलेल्या रुग्णास उपचार करताना प्रतिविष देऊन बरे केले जाते. त्यामुळे साप चावल्यास घाबरून न जाता तत्काळ रुग्णालयात दाखल करावे.

- डॉ. अनिल मस्के, मेडिसिन विभाग, स्वाराती रुग्णालय, अंबाजोगाई.