कडा (जि. बीड) : प्रेमप्रकरणातून डांबून केलेल्या मारहाणीत जालना जिल्ह्यातील युवकाचा मृत्यू झाला होता. यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आष्टी पोलिसांनी शोध मोहीम राबवत १२ तासांत सहा आरोपींना बेड्या ठोकल्या. अन्य चार जणांचा शोधार्थ पथके रवाना झाली आहेत.
विकास आण्णा बनसोडे (वय २३, रा. बोरगाव, ता. भोकरदन, जि. जालना) हा युवक आष्टी तालुक्यातील पिंपरी (घुमरी) येथील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे काही वर्षांपूर्वी ट्रकचालक म्हणून कामाला होता. १२ मार्च रोजी तो मित्रासह पिंपरी येथे आला होता. याच दरम्यान आपल्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून त्याला घराजवळच पत्र्याच्या शेडमध्ये डांबून दोरी व वायरने अमानुष मारहाण केली होती. यात तो १५ मार्च रोजी रात्री मयत झाला होता. याप्रकरणी मयताचा भाऊ आकाश बनसोडेच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात खुनासह ॲट्राॅसिटी कलमानुसार दहा जणांविरुद्ध १६ मार्च रोजी गुन्हा दाखल होता. आष्टी पोलिसांनी गुन्हा दाखल होताच अवघ्या १२ तासांत ६ आरोपींना ताब्यात घेतल्याचे उपविभागीय अधिकारी बाळकृष्ण हनपुडे यांनी सांगितले.
सहा जणांना २४ मार्चपर्यंत कोठडीभाऊसाहेब भानुदास क्षीरसागर, स्वाती भाऊसाहेब क्षीरसागर, सुवर्णा बाबासाहेब क्षीरसागर, संकेत भाऊसाहेब क्षीरसागर, संजय भवर, सुशांत शिंदे यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना सोमवारी दुपारी आष्टी न्यायालयात हजर केले असता २४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
नातेवाइकांच्या घरात आश्रयक्षीरसागर कुटुंबातील तिघेजण हे आपल्या हातोळण येथील नातेवाइकांच्या घरी लपून बसले होते. पोलिसांनी या सर्वांना बेड्या ठोकल्या. तर तिघांना गुन्हा दाखल होताच पिंपरी घुमरी गावातून अटक केली होती.