बीड : शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलात विजय पवार व प्रशांत खाटोकर या दोन शिक्षकांनी अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केला होता. या प्रकरणात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हडपसरचे राष्ट्रवादीचे आ. चेतन तुपे यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली.
विजय पवार याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचेच पाठबळ असल्याचा आरोप करीत या प्रकरणाच्या चौकशीसाठी महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आ. धनंजय मुंडे यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत पत्रही दिले होते. त्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हडपसरचे आ. चेतन तुपे यांनी बीडच्या प्रश्नावर आवाज उठविला. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करणार असल्याची घोषणा केली. तसेच या क्लासमध्ये आणखी कोणाचा असा छळ झाला आहे का, त्यांना दोनच दिवस कोठडी का मिळाली, त्यांना कोणाचा वरदहस्त आहे का, हेदेखील तपासू, असे फडणवीस म्हणाले. या नराधमांना कठोर शिक्षा मिळेलच; पण, त्यांना कोणी वाचवायचा प्रयत्न केला असेल तर त्यांनाही शिक्षा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
मंत्रिपद गेल्याचे दु:ख - संदीप क्षीरसागरमी या प्रकरणाच्या तपासाचा आढावा घेतला आहे. माझ्या जवळचे जरी असले तरी त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. मी तुमच्यासारखे १५० दिवस गायब झालो नाही. मंत्रिपद गेल्यामुळे त्यांना दु:ख झाले, असे प्रत्युत्तर आ. संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांच्या आरोपाला दिले. या गुन्ह्यात जसे बोलत आहेत, तसेच मस्साजोग प्रकरणात भूमिका घ्यायला हवी होती. मीदेखील या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देणार आहे. मला टार्गेट केले जात आहे. माझ्यावर जे आरोप झाले ते पोलिस तपासानंतर समोर येतील, असेही ते म्हणाले. विजय पवार आणि आमचे संबंध आहेत हे नाकारत नसल्याचेही क्षीरसागर म्हणाले.
मागणीला २४ तासांतच यशआपण केलेली मागणी २४ तासांतच पूर्ण झाली आहे. या प्रकरणातील पीडितांना न्याय मिळेपर्यंत आपण हे प्रकरण लावून धरू. घटनेशी माझा संबंध नसतानाही मीडिया ट्रायल झाले. पण, तरीही मी काही बोललो नाही. २५ वर्षे राजकारणात आहे. पण, कधीच कोणावर खोटे आरोप केले नाहीत. आरोप करणारे हे लोक आगामी काळात उघडे पडतील, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी एसआयटी स्थापनेच्या घोषणेनंतर दिली.
पवार, खाटोकरच्या कोठडीत वाढविजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना आधी दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. त्यानंतर तपास अधिकारी बदलले. मंगळवारी त्यांना पुन्हा हजर केले. न्यायालयाने दोघांनाही ५ जुलैपर्यंत वाढीव कोठडी दिली आहे.