मधुकर सिरसट
केज : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी ज्यांच्याकडे सुरू आहे त्या केज येथील मकोका जलदगती न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले व या प्रकारणातील सहआरोपी करण्याची मागणी असलेले दोन संशयित पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन व निलंबित असलेले पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील, यांनी शुक्रवारी केज येथील साईनगर (पूर्व ) परिसरात एकत्र येऊन धुळवड साजरी केल्याने खळबळ उडाली आहे.
भाजीपाले, महाजन व पाटील एकत्रित रंगांची उधळण करतानाचे फोटो समाज माध्यमावर झळकल्याने तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करणारे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, निलंबित पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्याशी लागेबांधे असतील तर, सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींना शिक्षा होईल का, असा प्रश्न आता देशमुख कुटुंबीयांना पडला आहे. या फोटोची शुक्रवारी दिवसभर केज तालुक्यात चर्चा सुरू होती.