बीड: गुन्हेगारी तपासामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग करत बीडपोलिसांनी एक मोठे पाऊल उचलले आहे. बीड पोलिसांनी ‘डीप आय’ नावाचे एक मोबाईल ॲप तयार केले आहे, ज्यात गुन्हेगारांच्या माहितीपासून ते सर्व गुन्ह्यांच्या अद्ययावत माहितीपर्यंत सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे खून, दरोडा, मारामारी किंवा चोरी यांसारख्या गुन्ह्यांच्या तपासात काही अडचण आल्यास, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या ॲपद्वारे पोलिसांना योग्य दिशा दाखवणार आहे. असे ॲप तयार करणारे बीड पोलिस हे महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात पहिले ठरल्याचा दावा केला जात आहे.
ॲपची मदत काय होणार?‘डीप आय’ ॲप पोलिसांचा तपास अधिक जलद आणि कार्यक्षम बनवेल. या ॲपमध्ये सर्व गुन्हेगारांची माहिती, त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे आणि फोटो उपलब्ध असतील. गुन्ह्याचा प्रकार आणि घटनास्थळाची माहिती दिल्यावर ॲप त्यासारख्या इतर गुन्ह्यांचा डेटा पोलिसांसमोर ठेवेल. यामुळे पोलिसांना कमी वेळात अधिक माहिती मिळवता येईल.
कर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण‘डीप आय’ ॲप यशस्वीपणे वापरण्यासाठी सर्व पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणात ॲप कसे वापरावे, गुन्हेगारांचा डेटा कसा अपडेट करावा आणि ‘एआय’च्या मदतीने तपासाची दिशा कशी ठरवावी, हे शिकवले जाईल.
१७ सप्टेंबरला होणार लाँच?हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प १७ सप्टेंबर रोजी लाँच होण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रातील आणि देशातील पोलिस दलासाठी हा एक पथदर्शी (पायोनियर) उपक्रम ठरेल.
कॉल आणि डेटाचे विश्लेषणही होणारहे ॲप केवळ गुन्हेगारांच्या डेटापर्यंत मर्यादित नाही. यात कॉल ॲनालिसिस (सीडीआर), कॉल रेकॉर्ड ॲनालिसिस आणि गुन्ह्याशी संबंधित फोटो यांचेही विश्लेषण करता येणार आहे. हे तंत्रज्ञान पोलिसांना आरोपींच्या फोन कॉलचा तपशील, लोकेशन आणि इतर डिजिटल पुरावे एकत्र करून तपासाला अधिक अचूक दिशा देण्यास मदत करेल. यामुळे अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल करणे सोपे होईल.
तपासाची गती वाढेलडीपआय ॲप हे गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी ‘गेम चेंजर’ ठरेल. या ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे तपासाची गती वाढेल आणि पोलिसांना गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य दिशा मिळेल. यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे अधिक सोपे होईल.- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक, बीड