बीड : पोलिसांच्या बदल्या म्हटले की, राजकीय लोकांचा हस्तक्षेप आलाच. बीडमध्ये तर हे नित्याचेच झाले होते; परंतु यावेळी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी वशिलेबाजीवाल्यांना थेट दूरचा रस्ता दाखविला आहे. प्रशासकीयसह इतर निकष वापरून जिल्ह्यातील ६०६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. वर्षानुवर्षे एलसीबीत ठाण मांडलेल्याही १५ कर्मचाऱ्यांचाही यात समावेश आहे. आता विनंती बदल्यांची प्रक्रिया सुरू असून पुढील आठवड्यात चालक अंमलदार व अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.
मार्च महिन्यात बदलीस पात्र कर्मचाऱ्यांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्याप्रमाणे मागील आठवड्यापासून बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. सर्व निकष वापरून जिल्ह्यातील ६०६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी पहाटे काढण्यात आले. यात वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी, तालुक्यात ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली. यावेळी कोणताही राजकीय दबाव किंवा वशिला लावणाऱ्यांचा विचार न करता अधीक्षकांनी ही प्रक्रिया राबविली. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या करून नवा विक्रमही केला आहे. सर्व बदल्या पारदर्शक झाल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे.
बदल्यांसाठी कोणते निकष?स्वग्राम, एकाच ठिकाणी पाच वर्षे, एकाच उपविभागात १२ वर्षे नोकरी केलेल्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.
पदानुसार झालेल्या बदल्यासहायक फौजदार - १४२हवालदार - २५४पोलिस नाईक/शिपाई - २१०
साहेब, आमची बदली थांबवागुरुवारी सकाळी बदल्यांचे आदेश निघताच दुपारच्या सुमारास काही कर्मचाऱ्यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी रांगा लावल्या. आम्हाला बीडमध्येच द्या, बदलीचे ठिकाण सोयीचे नाही, स्वत: किंवा नातेवाईक आजारी आहेत, आम्हाला ये-जा करण्याची सोय नाही, मुलगा/मुलगीच आजारी असते, अशी विविध कारणे सांगून बदली थांबविण्यासाठी अनेक कर्मचारी आले होते. यात काही महिलांचाही समावेश होता; परंतु त्यांना अधीक्षकांनी भेट नाकारल्याची माहिती आहे. आधी बदलीच्या ठिकाणी रुजू व्हा आणि मग अर्ज करा. त्यावर विचार केला जाईल, असे म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.
एलसीबीतील १५ जण बदललेस्थानिक गुन्हे शाखा ही विशेष शाखा आहे. येथे येण्यासाठी आतापर्यंत अनेकांनी वशिले लावले होते. त्यानुसार त्यांना यापूर्वी पोस्टिंगही मिळाली होती. काही जण परळीहून थेट एलसीबीत बसले होते. यात शाखा प्रमुखांचाही समावेश होता. आ. सुरेश धस यांनी यावर आरोपही केले होते. आता याच शाखेतील १५ कर्मचाऱ्यांना बदलले आहे. अद्याप त्यांच्या ठिकाणी नवीन कोणीही दिलेले नाही.
२०० जणांचा विनंती अर्जप्रशासकीय बदल्यानंतर आता विनंती बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात जवळपास २०० कर्मचाऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांना विशेष शाखांसह सोयीचे पोलिस ठाणे दिले जाणार आहे. ही प्रक्रिया गुरुवारी सुरू होती.
शाखांना कर्मचारी देणे बाकीएलसीबी, सायबर पोलिस ठाण्यांसह इतर शाखांमधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत; परंतु त्यांच्या ठिकाणी अद्याप नवे कर्मचारी दिले नाहीत. विनंती बदल्यांमधील लोकांना या ठिकाणी नियुक्ती मिळू शकते. एलसीबीसाठी आगोदर केलेल्या कामाचे मूल्यांकन तपासले जाणार आहे.
चालकांच्याही होणार बदल्याचालक अंमलदार यांच्याही बदल्या होणार आहेत. ही प्रक्रिया पुढील आठवड्यात राबविली जाणार आहे.
ठाणेदारांची होणार उचलबांगडीजिल्ह्यातील काही ठाणेदार वादग्रस्त ठरले होते. त्यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या जाणार आहेत. एकदा बाहेरचे अधिकारी बदलून आले की सर्वांची सांगड घालून बदल्या केल्या जाणार आहेत. यात काही ठाणेदार बदलले जाणार असून आतापर्यंत विशेष शाखा किंवा बाजूला बसलेल्या अधिकाऱ्यांना संधी दिली जाणार आहे. ही प्रक्रियाही पुढील आठवड्यात होणार आहे.