बीड : बारावीच्या इंग्रजी पेपरच्या परीक्षेदरम्यान कॉपी प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित संस्था चालकांना कळविले आहे. त्यामुळे संस्थाचालक कोणती भूमिका घेतात, हे लवकरच कळणार आहे.
इयत्ता बारावीच्या परीक्षांना १० फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या परीक्षेदरम्यान चौसाळा येथील कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय या केंद्राच्या मागील बाजूने काही लोक कॉपी पुरवितानाचे चित्र ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाले व त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत प्रशासकीय कारवाई आणि गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी रात्री केंद्र संचालक, पर्यवेक्षक अशा एकूण १७ जणांवर नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता तसेच त्यांना तडकाफडकी कार्यमुक्त केले. केंद्र संचालक व पर्यवेक्षक अशा १७ जणांवर एकाचवेळी कारवाईची जिल्ह्यात ही पहिलीच वेळ आहे.
बीडसह छत्रपती संभाजीनगर विभागातील काही परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकारांच्या बातम्या राज्यभर पसरल्या. यामुळे हे प्रकरण परीक्षा मंडळ आणि विभागीय आयुक्तांनी गांभीर्याने घेतले. परीक्षेबाबत आढावा घेत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत होणाऱ्या परीक्षांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष, भरारी पथके व निरीक्षण व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. बीड जिल्ह्यातील १०३ परीक्षा केंद्रांसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष व १०३ पथके कार्यरत केल्याचे व सर्व केंद्रांवर नियमित तपासणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. बीड येथील काही शिक्षकांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. संबंधित संस्थांना दोषी शिक्षकांचे निलंबन करण्याबाबत कळविल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.
या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचा समावेशचौसाळा येथील केंद्रावरील गैरप्रकार घडल्याप्रकरणी चौसाळा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील २, नेकनूर येथील प्रमिलादेवी कनिष्ठ महाविद्यालयातील ५, मांजरसुंबा येथील डॉ. पारनेरकर महाराज विद्यालयाचे ५, लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ५ अशा १७ जणांवर गुन्हा दाखल आहे. यात एक केंद्र संचालक तर इतर पर्यवेक्षक आहेत. हे सर्व खासगी संस्थेचे कर्मचारी आहेत. त्यांच्या निलंबनाबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी सूचना केल्याने संस्थाचालकही गोत्यात आले आहेत. संस्थाचालक कोणती कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.
Web Summary : Copying during a 12th-grade English exam led to police charges. Seventeen individuals face suspension, prompting institutional management concerns. Education officers have informed the relevant authorities, and the institution's decision is awaited.
Web Summary : 12वीं कक्षा की अंग्रेजी परीक्षा में नकल के कारण पुलिस में मामला दर्ज। सत्रह व्यक्तियों पर निलंबन की तलवार, जिससे संस्थागत प्रबंधन चिंतित। शिक्षा अधिकारियों ने संबंधित अधिकारियों को सूचित किया है, संस्था का निर्णय प्रतीक्षित है।