Beed Govind Barge Death: बीडमधील माजी उपसरपंच गोविंद बरगे यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नर्तकी पूजा गायकवाड हिला अटक केली होती. तिला सोमवारी १५ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गोविंद बरगे यांचे तुळजाई कला केंद्र पिंपळगाव येथील नर्तकी पूजा गायकवाड, मूळ गाव सासुरे हिच्याबरोबर प्रेम संबंध प्रस्थापित झाले होते. या प्रेम प्रकरणातून बरगे यांनी पूजावर लाखो रुपयांची उधळण केली. सासुरे येथे घर बांधून दिले, त्याचबरोबर वैराग येथे मानेगाव हद्दीत प्लॉट घेऊन दिला, सोने नाणे पैसा हे सर्व काही दिले, परंतु बरगे यांनी गेवराई येथे बांधलेल्या बंगल्यावर पूजाची नजर पडली. यावरूनच पूजा आणि गोविंद यांच्यात अबोला निर्माण झाला होता. या नैराश्यातूनच बरगे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती.
याप्रकरणी पूजाला ९ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. सुरुवातीला न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी, त्यानंतर दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. दोन दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर तिला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.