परळी : तालुक्यातील सीरसाळा येथील गट क्रमांक 390 मधील शेतीकडे जाण्यासाठी रस्ता खुला करून द्यावा, या मागणीसाठी 18 मार्च 2024 रोजी परळी तहसील कार्यालयाकडे निवेदन देण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्याने ३० जून रोजी सकाळी ११.३० वाजता शेतकरी ज्ञानेश्वर उद्धव दहिफळे यांनी थेट तहसील कार्यालयासमोर डिझेल टाकून आत्मदहनाचा धक्कादायक प्रयत्न केला. सुदैवाने, उपस्थित नागरिकांनी व पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करून हा प्रयत्न हाणून पाडला. परंतु, या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ज्ञानेश्वर दहिफळे यांची सिरसाळा येथील गट नंबर 390 मध्ये शेती असून त्या शेतीकडे जाणारा रस्ता अडविण्यात आल्यामुळे ते आपल्या जमिनीवर कोणतेही शेतीकाम करू शकत नाहीत. परिणामी, जमीन पडीक पडली असून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या संदर्भात दहिफळे यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे अर्ज, निवेदने दिली. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने दहिफळे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. अखेर सोमवारी तहसील कार्यालयासमोर त्यांनी अंगावर डिझेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
सोमवारी सकाळी ड्युटीच्या वेळी हेल्मेट नसणारा विरुद्ध कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयाजवळ पोलिसांचे पथक आले होते तेव्हा परळी शहर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिंगणे, पोलिसा अंमलदार आकाश जाधव, ट्राफिक पोलीस अंमलदार प्रल्हाद भताने या पोलिसांनी वेळेवर धाव घेऊन त्यांना रोखले.
पाहणी करून निर्णयशेतकऱ्याच्या मागणी संदर्भात ४ जुलै रोजी तहसील कार्यालयामार्फत स्थळ पाहणी करण्यात येईल. त्यानंतर कार्यवाही होईल, अशी माहिती तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली.