अंबाजोगाई : पोटच्या मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या पित्यास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्या. अजितकुमार भस्मे यांनी बुधवारी ठोठावली.
अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात एक कुटुंब ऊसतोड मजुरीचे काम करते. या कुटुंबातील पीडित मुलीचे अचानक पोट दुखू लागल्याने तिच्या आईने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान ती पीडित मुलगी गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती पीडित मुलीला तिच्या आईने विश्वासात घेऊन विचारली असता, मुलीने तिच्या स्वतःच्या वडिलांनी केलेल्या अत्याचाराचा पाढा वाचून दाखविला. आरोपी पिता हा सात ते आठ महिन्यांपासून दारू पिऊन पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार करत होता. यातूनच पीडित मुलगी गरोदर राहिली.
ही घटना समोर आल्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध धारूर पोलिस ठाण्यात कलम ३७६, ३७६ (२) (एफआयएन) भादंवि अन्वये पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. याचा तपास फौजदार प्रकाश शेळके यांनी करून दोषारोपपत्र दाखल केले. हे प्रकरण सुनावणीसाठी अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयासमोर आले. न्या. भस्मे यांनी सरकारी वकील ॲड. लक्ष्मण फड यांनी सादर केलेले साक्षीपुरावे तपासले, तसेच सात साक्षीदार व डीएनए रिपोर्ट ही साक्ष ग्राह्य धरून आरोपीस मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.