अंबाजोगाई: येथील अविनाश शंकर देवकर (वय ३५) याचा पैशाच्या वादातून खून झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी स्वराज कारभारी पौळ याला अवघ्या सहा तासांत अटक केली आहे. दरम्यान, मयतावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
अविनाश देवकर, आरोपी स्वराज पौळ आणि त्यांचा मित्र सलमान मुस्तफा शेख हे अंबाजोगाईतील एका हॉटेलमध्ये दारू पित बसले होते. त्यावेळी अविनाश आणि स्वराज यांच्यात पैशांवरून जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर अविनाश बाजूच्या केबिनमध्ये गेला असता, स्वराजने त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यात तो जागीच ठार झाला. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या सलमान शेखलाही दुखापत झाली. या घटनेनंतर सलमानने तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना माहिती दिली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी वेगाने सूत्रे हलवली. सीसीटीव्ही फुटेज आणि सीडीआरच्या मदतीने पोलिसांनी आरोपी स्वराजचा माग काढत त्याला पकडले. दरम्यान, अविनाशची आई अंजना शंकर देवकर यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्याला जाण्यापूर्वीच बेड्याआरोपी स्वराज पौळला पोलिसांनी अवघ्या सहा तासांत अटक केली. लातूरहून पुण्याला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना, पोलिसांनी तुळजापूर-सोलापूर महामार्गावर सापळा रचून त्याला रात्री दीड वाजता ताब्यात घेतले.