बीड : अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करून, तिची छेडछाड व विनयभंग केल्यामुळे कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या धक्कादायक प्रकरणातील आरोपी मनेश उर्फ बाळू गंगाधर जायगुडे (रा. दिमाखवाडी, ता. गेवराई) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ व्यंकटेश एच. पाटवदकर यांनी दोषी ठरवत ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
२९ मार्च २०२२ रोजी सकाळी ८ ते ८.४५च्या सुमारास ही घटना घडली होती. पीडित मुलगी शिक्षण घेत असताना, आरोपी मनेश जायगुडे हा गेल्या सहा महिन्यांपासून तिचा सतत पाठलाग करत असे. तो तिला "तू मला खूप आवडतेस" असे म्हणून त्रास देत होता. या छेडछाडीमुळे आणि गावात झालेल्या बदनामीमुळे मानसिक खच्चीकरण झालेल्या पीडितेने राहत्या घरी लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायालयात चाललेल्या या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. सहायक सरकारी वकील अजय श्रीमंतराव तांदळे यांनी केलेला युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला कलम ३०५, ३५४, ३५४-ड (भादंवि) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दोषी ठरवले. त्याला ६ महिने साधा कारावास आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास अतिरिक्त १ महिना साधा कारावास भोगावा लागणार आहे. या प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकारी गव्हाणे आणि सविता चव्हाण यांनी मोलाचे सहकार्य केले.
Web Summary : A Beed man received six months jail for harassing a minor girl, leading to her suicide. He stalked her, professing his love, causing immense distress. The court found him guilty under relevant IPC sections and POCSO act.
Web Summary : बीड में एक लड़की को आत्महत्या के लिए उकसाने वाले व्यक्ति को छह महीने की जेल हुई। आरोपी उसे परेशान करता था, जिससे तंग आकर उसने यह कदम उठाया। अदालत ने उसे दोषी पाया।