धारूर (जि. बीड): गावी जाण्याआधी पत्नी आणि मुलासोबत आईस्क्रीम खाण्यासाठी थांबणे एका नागरिकाला चांगलेच महागात पडले आहे. बदामशेक संपेपर्यंत गाडीच्या डिक्कीत ठेवलेले ५० हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना धारूर शहरात उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील जहागीर मोहा येथील महादेव मुंजा मंदे हे आपल्या पत्नी शिवकन्या आणि लहान मुलगा कार्तिक यांच्यासह २१ जुलै रोजी दुपारी हिरो कंपनीची मोटरसायकल (क्रमांक MH 44 AD 2189) घेऊन महाराष्ट्र ग्रामीण बँक, धारूर येथे एक लाख रुपये काढण्यासाठी गेले होते.
बँकेतून त्यांना ५० हजार रुपये (५०० रुपये दराच्या १०० नोटा) आणि ५० हजार रुपये (१०० रुपये दराच्या ५०० नोटा) मिळाले. यातील ५०० रुपयांचे बंडल त्यांनी स्वतःच्या खिशात ठेवले, तर १०० रुपयांची बंडले डिक्कीत ठेवून लॉक लावले. नंतर ते तांदळवाडी चौकातून गावाकडे परत जात असताना छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील हुतात्मा स्मारकाजवळील आईस्क्रीमच्या गाडीजवळ थांबले. थोडावेळ बदामशेक खाण्यासाठी गेले असता गाडीची डिक्की उघडी दिसली.
तपासणी केल्यावर लक्षात आले की, डिक्कीत ठेवलेले ५० हजार रुपये गायब झाले आहेत. या प्रकरणी महादेव मंदे यांनी धारूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू वायबसे करत आहेत.