पाटोदा : अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर बांमदळ कोठा पुलानजीक भरधाव कारने उभ्या ट्रॅव्हल्सला धडक दिली. या भीषण अपघातात एका मुलासह दोघे जागीच ठार झाले. हा अपघात गुरुवारी मध्यरात्री रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला. ही कार कार्यक्रमासाठी केज येथील पाहुण्याकडे जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.
पुणेकडून केजकडे भरधाव निघालेल्या कारने नांदेड येथील खासगी कंपनीच्या ट्रॅव्हल्सला धडक दिली. यात अल्ताफ शेख (वय ४०) व अलमन शेख (वय १५, दोघेही रा. पुणे) अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलिस, पाटोदा पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर सुरू करण्यात आली.