केज/बीड : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी फरार असलेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश कुटे याची पत्नी अर्चना कुटेला अखेर पुण्यातून मंगळवारी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सीआयडीच्या पथकाने ही कारवाई केली. त्यानंतर केजमध्ये दाखल दोन गुन्ह्यांच्या संदर्भात बुधवारी केज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अर्चना कुटेला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात राज्यभरात एकूण ८७ गुन्हे दाखल असून, फसवणूक झालेल्या रकमेचा आकडा ७३४.३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तो आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ज्ञानराधा मल्टिस्टेटने जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून हजारो ठेवीदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले; मात्र मुदत संपल्यानंतर ठेवीदारांना पैसे परत केले नाहीत. या विरोधात अनेक ठेवीदारांनी आंदोलन केले होते आणि न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात आतापर्यंत १९ आरोपींपैकी १० जणांना अटक करण्यात आली असून, ९ जण अद्याप फरार होते. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीआयडीच्या पथकाने अर्चना कुटेला अटक केल्याने एक आकडा कमी झाला आहे. यापूर्वी तिचा पती आणि संस्थेचे संस्थापक सुरेश कुटेलाही अटक करण्यात आली होती. तो सध्या पोलिस कोठडीत आहे. अर्चना कुटेच्या अटकेमुळे ठेवीदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पुढील तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांनी केली होती कानउघडणीपावसाळी अधिवेशनात बीडमधील काही आमदारांनी मल्टिस्टेटचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सीआयडी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी तपासातील संथ गती पाहून फडणवीस यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली होती. तसेच बीडमध्ये आल्यावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनीही कृती समिती आणि पोलिसांसोबत बैठक घेतली होती.
केवळ ४३ कोटींची मालमत्ता गोठवलीया घोटाळ्यातील मालमत्ता गोठवण्याची प्रक्रियाही सुरू आहे. आतापर्यंत ३५ बँक खाती आणि ८० मालमत्ता गोठवण्यात आल्या असून, त्यांची किंमत ४३.७४ कोटी रुपये आहे. सीआयडीकडून अत्यंत संथ तपास सुरू असल्याचा आरोप ठेवीदारांनी केलेला आहे.
तीन दिवसांची कोठडीछत्रपती संभाजीनगर सीआयडीच्या पथकाने अर्चना कुटेला पुणे येथे ताब्यात घेतले आहे. त्यानंतर केज तालुक्यात ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या विरोधात दाखल झालेल्या 2 गुन्ह्याच्या संदर्भात अर्चना कुटेला बुधवारी (दि. 17 ) पहाटे 4 वाजता येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान त्यांना केज न्यायालयात हजर करण्यात आले होते. केज न्यायालयाने अर्चना कुटेला दि. 19 सप्टेंबर पर्यंत 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
लाखोंची बीएमडब्ल्यू जप्तअर्चना कुटे वापरत असलेली बीएमडब्ल्यू कंपनीची महागडी दुचाकी तीन दिवसांपूर्वीच सीआयडीच्या पथकाने जप्त केली आहे. ती दुचाकी केज पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्याचे पोलीस सूत्राने सांगितले.