रिॲलिटी चेक
बीड : तुमच्या छातीत दुखतंय तर आम्ही इथे काही करू शकत नाही. तुम्ही बीडला जा. आम्ही चिठ्ठीवर फिजिशियन ओपिनियन लिहिले आहे. इथे साधी गोळीही देऊ शकत नाही, असे बेजबाबदार वक्तव्य बीएएमएस डॉक्टरने केले. एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याचे कारण पुढे करीत आलेल्या रुग्णांना रिकाम्या हाताने परत पाठविल्याचा धक्कादायक प्रकार पाटोदा तालुक्यातील अंमळेनर प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी घडला आहे.
पाटोदा तालुक्यात नायगाव, डोंगरकिन्ही, वाहली आणि अंमळनेर अशी चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. वाहली आणि नायगाववगळता दोन्हीही ठिकाणी करोडोंच्या टोलेजंग इमारती आहेत. येथे वैद्यकीय अधिकारीही नियुक्त केलेले आहेत. अंमळनेर आरोग्य केंद्रात डॉ. खरमाटे यांनी राजीनामा दिल्यानंतर डाॅ. परमेश्वर बडे हे एकमेव डॉक्टर येथे आहेत. त्यांना सोबत म्हणून आरबीएसकेमधील डॉ. जोशी यांना कर्तव्य बजावण्यास सांगितले आहे. याच टोलेजंग इमारतीतील केंद्राला बुधवारी सकाळी अचानक भेट दिली. यावेळी डॉ. जोशी हे हजर होते. छातीत दुखतंय, असे सांगितल्यावर त्यांनी बीपी तपासला. काहीही त्रास नसताना त्यांनी तुम्हाला फिजिशियन ओपिनियन घ्यावे लागेल, असे सांगत बीडला जाण्याचा सल्ला दिला. आम्हाला जाईपर्यंत खूप त्रास होईल. तोपर्यंत काही तरी प्राथमिक उपचार म्हणून एखादी गोळी तरी द्या, अशी विनंती केली. परंतु, इथे काहीही देऊ शकत नाही. तुम्हाला बीडलाच जावे लागेल, या मतावर ते ठाम होते. यावरून येथील डॉक्टरांचा निष्काळजीपणा दिसून येतो. लाखोंचे वेतन असतानाही सामान्यांना आरोग्य सेवा देण्यात डॉक्टर कमी पडत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता यावर कारवाई होती की, त्यांना पाठबळ मिळते, हे वेळच ठरविणार आहे.
म्हणे, कोरोना चाचणीसाठी कीटची गरज नाही
आमच्या मित्राला कोरोना चाचणी करायची आहे, असे डॉ. जोशी यांना विचारले. यावर त्यांनी एका कर्मचाऱ्याकडे बोट दाखविले. त्यांना पीपीई कीटची विचारणा केली असता आता काही गरज नाही, असे बेजबाबदार वक्तव्य डॉ. जोशी यांनी केले. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्याला मास्कही नव्हता.
वैद्यकीय अधिकरी सकाळी गैरहजर, दुपारी हजर
'लोकमत'ने पाहणी केल्यानंतर ही सर्व माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एल. आर. तांदळे यांना देण्यात आली. तसेच डॉ. परमेश्वर बडे यांनाही संपर्क केला. यावर त्यांनी आपण बाहेर असल्याचे सांगितले. 'लोकमत'ने संपर्क साधताच ते केंद्रात दाखल झाले.
फार्मासिस्टही न सांगताच गायब
येथील फार्मासिस्टही बुधवारी हजर नव्हते. विशेष म्हणजे ते न सांगताच गायब होते. आलेल्या रुग्णांना औषधी देण्यासही कोणी नव्हते. शिपायानेच रुग्णांची नोंदणी करून घेतली.
कोट
अंमळनेर आरोग्य केंद्रातील तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत वैद्यकीय अधिकारी यांना नोटीस बजावली आहे. गैरहजर फार्मासिस्टचे वेतनही कपात केले जाईल.
डॉ. एल. आर. तांदळे, तालुका आरोग्य अधिकारी, पाटोदा
===Photopath===
030321\032_bed_22_03032021_14.jpeg~030321\032_bed_21_03032021_14.jpeg
===Caption===
'लोकमत'ने संपर्क साधताच वैद्यकीय अधिकारी डॉ.परमेश्वर बडे केंद्रात हजर झाले.~अंमळनेर अरोग्य केंद्रातील बीएएमएस डॉक्टरने लिहिलेला ओपीडी पेपर.