या किल्ल्याची दुरवस्था झाली होती. या वास्तुची दुरूस्ती व जतन करण्याची मागणी अनेक वर्षापासून होती. पाच वर्षापूर्वी या किल्ला दुरूस्तीला निधी मिळाला. तीन टप्प्यात किल्ला दुरूस्तीचे काम पुरातत्व विभागामार्फत झाले. किल्ल्याच्या दर्शनीय भागाचे समोरील सात गडाचे काम झाले. मुख्य प्रवेशद्वार झाले. मात्र संबंधित गुत्तेदार व पुरातत्व विभागाचे अधिकारी यांनी पडलेल्या भिंतीचे काम निकृष्ट केल्याने या भिंतीपैकी तीन भिंती ढासळल्या. इतर भिंतीही फुगल्या होत्या. हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे शिक्कामोर्तबच झाले. या कामाची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी पाच वर्ष या गुत्तेदाराची असल्याने पडलेल्या भिंती दुरूस्त करणे त्यांचे काम होते. पुरातत्व विभागाचे अधिकारी यांनी काम करण्याचे गायत्री कन्स्ट्रक्शनला आदेश दिले. शहरातील इतिहास प्रेमी, सकल मराठा समाज युथ क्लब, कायाकल्प फाउंडेशनने हे काम दर्जेदार करण्याची मागणी केली. या कामाकडे लक्ष ठेवले. इतिहास प्रेमी विजय शिनगारे यानी तर नियमित भेट देऊन मातीच्या भरावासाठी विरोध केला. भिंतीचे काम दर्जेदार करायला लावले. पुरातत्व विभागाने अभियंता नितीन चारूळे यांची नेमणूक करून या कामावर लक्ष ठेवले. मात्र भिंती वर गेल्यावर काम आटोपण्यासाठी पुन्हा मातीचा भराव भरल्या जात आहे. पुढील भिती लक्षात घेऊन पुन्हा हे काम चांगल्याच दर्जाचे करावे, अशी मागणी होत आहे. या कामाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
कामाचा दर्जा पुरातत्व विभागाने जपावा- विजय शिनगारे
धारूर येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने तीन वर्षात ढासळल्या. आता मातीचा भराव टाकू नये. भिंतीचे काम चांगल्या दर्जाचे करावे, अशी मागणी येथील इतिहासप्रेमी विजय शिनगारे यांनी केली आहे.