परळी (जि. बीड) : पंगतीच्या कार्यक्रमात किरकोळ वाद झाल्यानंतर तेथून निघून जाणाऱ्या युवकाला चार दुचाकींवर आलेल्या तरुणांनी रिंगण करून मारहाण केली. त्यानंतर पायावर डोके टेकविण्यास भाग पाडले. टोकवाडीतील डोंगर परिसरात ही अमानुष घटना घडली. या प्रकरणी २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, सातजणांना ताब्यात घेतले आहे.
शिवराज दिवटे हा शुक्रवारी दुपारी परळीतील जलालपूर येथील मंदिरात पाहुण्यांच्या पंगतीच्या कार्यक्रमात मित्रासोबत जेवायला गेला होता. जेवण केल्यानंतर तो थर्मल रोडने लिंबूटा गावी दुचाकीवर मित्रासोबत जात असताना एका पेट्रोलपंपासमोर चार दुचाकीस्वार आले. त्यांनी शिवराजची दुचाकी अडविली. नंतर दुचाकीवर बसवून टोकवाडी रस्त्यावरील माळाजवळ घेऊन गेले आणि बेदम मारहाण केली. या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी आरोपींना अटक करण्याची कारवाई सुरू केली आहे. शिवराज दिवटे यास झालेल्या बेदम मारहाण प्रकरणाचा परळीत अनेकांनी निषेध नोंदविला आहे.
अशी आहेत आरोपींची नावेया प्रकरणी शिवराज दिवटे यांच्या जबाबावरून परळीच्या संभाजीनगर पोलिस ठाण्यात शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपींमध्ये समाधान मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गीते, ऋषिकेश गिरी, प्रशांत कांबळे, संमित्र शिंदे, सौमित्र गोरे, रोहन वागलकर, सुराज्य गित्ते, सूरज मुंडे यांचा समावेश असून, इतर ११ अनोळखी युवकांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरोपी हे टोकवाडी, डाबी, नंदागौळ, परळी येथील रहिवासी आहेत. आरोपींनी मारहाण करतानाचे व्हिडीओ शुटिंग केले व नंतर ते समाजमाध्यमांवर व्हायरल केले.
रॉड, कत्ती, काठ्यांचा वापरलोखंडी रॉड, कत्ती, बेल्ट तसेच लाकडी काठ्यांचा वापर केल्याचा जबाब शिवराज दिवटे यांनी पोलिसांकडे नोंदविला आहे. सकाळी जलालपूर येथे जेवण करीत असताना काही मुलांचे भांडण झाले होते. त्यावेळी आपण तेथे होतो, त्यामुळे आपणास मारहाण केल्याचे शिवराज यांनी तक्रारीत म्हटले.
या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून सातजणांना ताब्यात घेतले आहे. यात कोणीही जातीयवाद करू नये. शांतता राखावी. सर्व आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल.नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक, बीड