बीड : थकलेल्या वीज बिलामुळे आरटीओ कार्यालयातील विद्युत पुरवठा महावितरणने खंडित केला आहे. तर, पर्यायी व्यवस्था देखील उपलब्ध नसल्यामुळे कामासाठी आलेल्या सर्वांना परत जावे लागले. इतर दिवशी देखील दलालांच्या माध्यमातून गेले तरच कामे होतात अशी ओरड असते. त्यात वीज खंडित केल्यामुळे आरटीओ कार्यालयातील कामाच्या संदर्भात ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास’ अशी चर्चा नागरिकांमध्ये दिवसभर होती.
महावितरण कंपनीची आरटीओ कार्यालयाकडे जवळपास १ लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीसाठी महावितरण कंपनीने आरटीओ कार्यालयाला नोटीस देखील बजावली होती. मात्र, तरीही आरटीओ कार्यालयाने पैसे भरले नसल्याने कार्यालयाचे विजेचे कनेक्शन तोडण्यात आले. त्यामुळे कार्यालयाचे कामकाज सोमवारी पूर्णत: बंद होते. कार्यालयाकडे जनरेटरही नसल्याने संपूर्ण कामकाज ठप्प पडल्याने विविध कामासाठी आलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागले होते. इतर दिवशीदेखील जे काम काही दिवसांत होणे अपेक्षित असताना, त्याला जास्त दिवस लागतात, तर थेट एखादा व्यक्ती कामासाठी गेल्यानंतर त्याचे काम अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून केले जात नाही. त्यासाठी आरटीओ कार्यालयाच्या बाहेर बसलेल्या दलालांचीच मदत घ्यावी लागते. त्यामुळे नागरिकांची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात होते. रोज लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार दलालाच्या माध्यमांतून केला जातो. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच सोमवारी विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे कामाचा खोळंबा झाला होता.
अधिकारी नसल्याने खोळंबा
बीड येथील उपप्रादेशिक कार्यालयात सक्षम अधिकारी नसल्यामुळे संपूर्ण कार्यालयाची शिस्त बिघडली आहे. त्यामुळे कर्तव्यदक्ष अधिकारी याठिकाणी असणे गरजेचे आहे. तसेच दलालमुक्त आरटीओ कार्यालय करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
===Photopath===
220321\222_bed_11_22032021_14.jpg
===Caption===
आरटीओ कार्यालयातील वीज खंडीत केल्यामुळे नागरिकांना दिवसभर बसून राहवे लागले