बीड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन युवकाने गावाचे आणि आई-वडिलांचे नाव मोठे केले. त्याचा अभिमान बाळगत अख्ख्या गावाने डोक्यावर घेतले. परंतु त्याच युवकाने आता नाशिक येथील प्रशिक्षण केंद्रात सोमवारी (दि. १७) गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. याचे कारण जरी अस्पष्ट असले तरी आज गेवराई तालुक्यातील अर्धपिंपरी व धोंडराई गावातील लोक ढसाढसा रडत आहेत.
सोमेश्वर भानुदास गोरे (३२, रा. अर्धपिंपरी, ता. गेवराई, ह.मु. खोली क्र.- १५५, दक्षिण वसतिगृह, एमपीए) असे आत्महत्या केलेल्या प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. जानेवारी महिन्यापासून महाराष्ट्र पोलिस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक म्हणून प्रशिक्षण घेत होते. सोमवारी दुपारी ते प्रशिक्षण घेत असलेल्या १५ क्रमांकांच्या स्कॉडसह १३, १४ क्रमांकांच्या स्कॉडमधील प्रशिक्षणार्थींची उंटवाडी येथील बालसुधारगृह भेटीचे आयोजन करण्यात आले होते. पाऊण वाजेच्या सुमारास ही भेट आटोपल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना पोलिस नाईक चंद्रकांत पांडुरंग घेर (३२, रा. नेम, कवायत निर्देशक, एमपीए) यांनी वसतिगृहात सोडले. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास स्कॉड फॉलिंग घेण्यात आले. स्कॉड कॉरपरेर भरत नागरे यांनी घेर यांना कळविले की, प्रशिक्षणार्थी गोरे हे फॉलिंगला हजर राहिलेले नाही. त्यानंतर त्यांनी स्कॉड मार्च करून गोरे राहत असलेल्या दक्षिण वसतिगृह खोली क्र.-१५५ गाठली. तेथे खिडकीतून आतमध्ये डोकावून बघितले असता त्यांनी गळफास घेतलेला असल्याचे आढळून आले, अशी खबर घेर यांनी गंगापूर (जि. नाशिक) पोलिसांना कळविली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्टगोरे यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अस्पष्ट आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी कुठल्याही प्रकारची चिठ्ठी वगैरे काहीही लिहून ठेवलेली नाही. ते वापरत असलेला मोबाइल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, तपासणीकरिता पाठविल्याचे सांगण्यात आले.
१८ मार्चला निवड अन्..सोमेश्वर यांचे गाव अर्धपिंपरी असले तरी शिक्षणासाठी ते धोंडराई येथे मामाकडे रहात होते. सोमेश्वर हा उत्तीर्ण झाल्याचा निकाल हा १८ मार्च २०२४ रोजी लागला होता. आता बरोबर एक वर्षांनी म्हणजेच १८ मार्च २०२५ रोजी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. यामुळे या दोन्ही गावातील लोकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोमेश्वर यांच्या पश्चात आई, वडील दोन भाऊ असा परिवार आहे.
दोन्ही गावात पहिलाच फौजदारगेवराई तालुक्यातील धोंडराई आणि अर्धपिंपरी या दोन्ही गावात पहिल्यांदाच सोमेश्वर हे पहिलेच फौजदार होते. त्यांच्या प्रेरणेने अनेक तरूण पोलिस भरतीच्या तयारीला लागले होते. परंतू त्यांंच्या अशा अचानक घेतलेल्या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे.
पायाला जखम झाल्याने उपचारप्रशिक्षणादरम्यान सोमेश्वर यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे मागील २७ दिवसांपासून ते एमपीएमध्ये असलेल्या रूग्णालयात उपचार घेत होते.