अंबाजोगाई आरटीओ कार्यालय इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:42 AM2021-02-25T04:42:13+5:302021-02-25T04:42:13+5:30

अंबाजोगाई : स्व. डॉ. विमल मुंदडा यांच्या प्रयत्नांमुळे १६ वर्षांपूर्वी अंबाजोगाई येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर होऊन सुरू झाले ...

Administrative approval for construction of Ambajogai RTO office building | अंबाजोगाई आरटीओ कार्यालय इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मंजुरी

अंबाजोगाई आरटीओ कार्यालय इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मंजुरी

googlenewsNext

अंबाजोगाई : स्व. डॉ. विमल मुंदडा यांच्या प्रयत्नांमुळे १६ वर्षांपूर्वी अंबाजोगाई येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर होऊन सुरू झाले होते. आता त्यांच्या सुनेच्या म्हणजेच आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्यामुळे या कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून ११.३१ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

त्यामुळे लवकरच लोखंडी सावरगाव शिवारात गट क्र. ६३ मध्ये दहा एकरांत आरटीओ कार्यालयाची सुसज्ज आणि अद्ययावत इमारत उभी राहणार असून नागरिकांची गैरसोय टळणार आहे.

बीड जिल्ह्याच्या तत्कालीन पालकमंत्री स्व. डॉ. विमल मुंदडा यांनी २००४ साली अंबाजोगाईसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय प्रयत्नपूर्वक मंजूर करून आणले. या कार्यालयासाठी लोखंडी सावरगाव परिसरात गट क्र. ६३ मधील दहा एकर जमीनदेखील उपलब्ध करून देण्यात आली होती. या कार्यालयामुळे अंबाजोगाईसह परळी, माजलगाव, केज, धारूर आणि वडवणी या तालुक्यांतील वाहनधारकांची मोठी सोय झाली. सुरुवातीला हे कार्यालय यशवंतराव चव्हाण चौकात भाडेतत्त्वावर खाजगी जागेत होते. त्यानंतर ते जोगाईवाडी शिवारात हलवण्यात आले. तर जड वाहनांची तपासणी आणि चालक परवान्याच्या चाचण्या मात्र चार किमी अंतरावर लोखंडी सावरगाव परिसरातील ‌तकलादू ट्रॅकवर घेण्यात येतात.

औरंगाबाद येथील उपमुख्य वास्तूविशारद यांच्याकडून बांधकामाचा नकाशा तयार करण्यात येऊन अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यानंतर हा प्रस्ताव बांधकाम विभागाकडून परिवहन विभागास पाठविण्यात आला. अखेर परिवहन विभागाने सदर इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मंजुरी देत ११.३१ कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. या मंजुरीमुळे आरटीओ कार्यालयाला स्वतंत्र आणि सुसज्ज इमारत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अशी असणार नवी इमारत

नवीन आरटीओ कार्यालय दहा एकर जागेत उभारण्यात येणार आहे. त्यात दोन मजली मुख्य कार्यालयीन इमारतीसह चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठीचे निवासस्थान असतील. मुख्य इमारत फर्निचर, सोलर पॅनल, अग्नी सुरक्षा उपकरणे, रेन हार्वेस्टिंग आदी सुविधांसह सुसज्ज असेल. दुचाकी आणि चारचाकी वाहनासाठी स्वतंत्र वाहनतळ असतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या ठिकाणी वाहनविषयक विविध चाचण्यांसाठी चार ‌अद्ययावत ट्रॅक असणार आहेत.

बीडच्या आधी अंबाजोगाई कार्यालयाला मिळाली इमारत

बीड आणि अंबाजोगाई येथील आरटीओ कार्यालये सुरू झाल्यापासून ते आजतागायत भाड्याच्या जागेत आहे. परंतु, आता बीडच्याही आधी अंबाजोगाई कार्यालयाला स्वतःची इमारत मिळणार आहे. त्यामुळे बीड कार्यालयालाही स्वतंत्र इमारत द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: Administrative approval for construction of Ambajogai RTO office building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.