केज: तालुक्यातील उमरी शिवारातील टोलनाक्या जवळ रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान पिकअप व कार यांच्यात समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघात आठ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. अपघातात गंभीर जखमी झालेल्या आठ जणांमध्ये चार पुरूष, दोन महिला व एका बालकांचा समावेश आहे.
केज बीड राष्ट्रीय महामार्गांवर उमरी शिवारातील टोलनाक्या जवळ स्विफ्ट कार (एमएच-14/एफसी-2038) ही अंबाजोगाईहून बीडच्या दिशेने भरधाव वेगात जात आसताना पुण्याहून नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील आपल्या गावाकडे जात असलेल्या पिकअप (एमएच-14/एचयु-7142) यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपगातात पीकअपचे चालकाच्या बाजूचे टायर तुटून पडले.
कारमधून प्रवास करणारे चौघे व पीकअपमधील दोन महिला व दोन मुले असे एकूण आठजण जखमी झाले आहेत. त्यापैकी आवेज सुभान गवळी यांच्या हाताला व चेहऱ्याला तर जिजाबाई व्यंकट कानगुटे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ते दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अलिफ शेख, महम्मद साबेर शेख, अझर शेख व शोभा कानगुटे यांच्यासह दोन मुले असे एकूण आठजण जखमी आहेत. जखमी रुग्णांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर 4 गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ दत्तात्रय केंद्रे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
पोलिसांची तत्परता...या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वैभव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे यांनी पोलीस कर्मचाऱ्या सह घटणास्थळी भेट देवून जखमीना केजच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.