- नितीन कांबळेकडा : ऊसतोड मजुराच्या कुटुंबातील लग्न लावले आणि अन्य काही मजूर नव्याने ठरवून मुकादमासह दोघेजण जीपमधून गावाकडे जात असताना चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने जीप झाडावर आदळली. यात दोघांचा जागीच, तर अन्य एकाचा दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अकोले बुद्रुक येथील तानाजी संभाजी माने हे ऊसतोड मुकादम म्हणून काम करत होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील काही मजूर त्यांच्याकडे काम करतात. २१ रोजी एका मजुराच्या घरात लग्न असल्याने मुकादमासह संतोष नवले, बापू जाधव हे तिघेजण जीपने (क्र. एमएच ४५ एझेड ५०७७) पाथर्डीला आले. लग्न लावले, नवीन मजूर बघून इसार देऊन माने रात्री एक ते पावणेदोनच्या सुमारास घराच्या दिशेने निघाले.
पाथर्डी-अहिल्यानगर महामार्गावरील आष्टी तालुक्यातील मराठवाडी शिवारातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या चिंचेच्या झाडावर जीप आदळली. यात संतोष साहेबराव नवले, बापू राजेंद्र जाधव या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चारचाकी चालक मुकादम तानाजी संभाजी माने हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान त्यांचादेखील मृत्यू झाला. २४ मे रोजी अंभोरा पोलिस ठाण्यात रामचंद्र साहेबराव नवले यांच्या फिर्यादीवरून भरधाव वाहन चालविताना निष्काळजीपणा करून दोघांच्या व स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी मयत चालक संभाजी माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.