आष्टी/कडा : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा गाव आणि परिसरात सोमवारी पहाटे झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने संपूर्ण परिसरात हाहाकार माजला असून, नदी-नाल्यांना मोठा पूर आला आहे. पुराचे पाणी अनेक घरांत आणि हजारो एकर शेतांत पसरले आहे. अनेक पूल पाण्याखाली गेले असून काही गावांचा संपर्क तुटला आहे.
पुराच्या पाण्यात एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली, तर दुसऱ्या घटनेत मदत न मिळाल्याने वृद्धाचा घरातच मृत्यू झाला. संपूर्ण कडा गावात पाणी शिरले आहे. कडी नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्य आणि संसारोपयोगी वस्तूंचे, तसेच वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. परिस्थिती बिकट झाल्याने कडा परिसरात घरांमध्ये अडकलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढण्यासाठी सैन्यदल, तसेच ‘एनडीआरएफ’ आणि ‘एसडीआरएफ’चे पथक पाचारण करण्यात आले. पुरातून २१ जणांना हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात आले.
आष्टी तालुक्याच्या पश्चिमेकडे असलेल्या गर्भगिरी डोंगररांगांवर सोमवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस झाला. या पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला. पावसाने दौलावडगाव घाट देऊळगाव गौखेल उंदरखेल या भागातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. याच्या परिणामी देवळाली, देवळा, कडा आदी गावांमध्ये पाणी शिरले. अनेक घरे आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांना घरातून बाहेर पडता येत नव्हते. अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये पाणी शिरले. अनेक घरांतील संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या.
या ढगफुटीसदृश पावसामुळे सहा गावांमध्ये ५३ लोक पाण्याच्या प्रवाहात अडकले होते. यामध्ये कडा येथील ११, चोभा निमगाव १४, घाटा पिंपरी ७, पिंपरखेड ६, धानोरा ३, डोंगरगण ३ आणि इतर आठ लोकांचा समावेश आहे. यातील २१ लोकांना हेलिकॉप्टरने तर इतरांना स्थानिक लोकांनी मदत करून बाहेर काढले.
पुरामुळे देवीनिमगाव येथील पूल वाहून गेल्याने कडा-धामणगाव रस्ता बंद झाला आहे, तसेच तालुक्यातील मेहकरीसह अनेक धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. आमदार सुरेश धस यांच्या पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी आणि लष्कराच्या मदतीने नाशिकहून हेलिकॉप्टर बोलावले आहे. त्याचबरोबर, पुण्याहून एनडीआरएफ आणि ‘एसडीआरएफ’ची टीमही मदतीसाठी आष्टीला पाठवली. सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
‘लोकमत’ प्रतिनिधीचीही मदतघाटा पिंपरी येथे कडी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात दोन कुटुंबे अडकली होती. ‘लोकमत’चे प्रतिनिधी नितीन कांबळे आणि त्यांचे सहकारी प्रदीप साबळे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून या कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पिकांनाही फटकाया पावसाचा खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग, तूर आणि ऊस या पिकांना मोठा फटका बसला असून, शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. प्रशासनाने नुकसानीची पाहणी केली.
परळीत १५ गावांचा संपर्क तुटलापरळी तालुक्यातही पावसाने हाहाकार माजवला. नदीला पूर आल्याने १५ गावांचा संपर्क तुटला होता. नदीचे पाणी ओसरल्यानंतर दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाली.
१५ मंडळांत अतिवृष्टीजिल्ह्यात रविवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे बीड तालुक्यातील नाळवंडी मंडळामध्ये (६७ मिमी), नेकनूर (७०.३ मिमी), येळंब घाट (९९ मिमी), आष्टी तालुक्यातील दौलावडगाव मंडळामध्ये (८०.८ मिमी), धानोरा (९३.३ मिमी), कडा (६७ मिमी), पिंपळा (९१ मिमी), टाकळसिंग (६७ मिमी), दादेगाव (९६.३ मिमी), अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी मंडळामध्ये (८६.५ मिमी), पाटोदा (८६.५ मिमी), केज तालुक्यातील केज मंडळामध्ये (७४.३ मिमी), युसूफ वडगाव (६६.३ मिमी), होळ (६८.८ मिमी), शिरूर तालुक्यातील शिरूर मंडळामध्ये (१०४.३ मिमी) अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
मांजरा, माजलगाव धरणातून पाण्याचा विसर्ग वाढलामांजरा धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सोमवारी दुपारी ३:३० वाजता गेट क्र. ३ आणि ४ हे ०.२५ मीटरने उघडण्यात आले. सध्या धरणातून १७,३३३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तसेच माजलगाव धरण ९६.१५ टक्के भरले असून, पाण्याची पातळी ४३१.६५ मीटर आहे. धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक (१,५३८.८९ क्युसेक) होत असल्याने सांडव्याद्वारे १०९४.४४ क्युसेक (३८,६५१ क्युसेक) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.