बीड : राज्य सरकारने शुक्रवारी नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी आणखी ७५ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. आतापर्यंत राज्याने या मार्गाला ८६६ कोटी ८४ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला आहे.परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाचे काम सध्या गतीने सुरू आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती दिनाच्या एक दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मार्गाची घोषणा करून २ हजार ८२६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी ५० टक्के हिस्सा राज्य सरकारकडून केंद्रीय रेल्वे बोर्डास उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्याने मंत्रिमंडळ स्तरावर घेतलेला आहे. या प्रकल्पासाठी रेल्वे विभागाने २ नोव्हेंबर २०१८ च्या पत्रान्वये मागणी केल्याप्रमाणे निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार आज ७५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून, गृह विभागाने तसे आदेश निर्गमित केले आहेत. या निधीमुळे कामास गती मिळणार आहे.
नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी मिळाले आणखी ७५ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:16 IST