गालावर पडणारी खळी ही अनेकांच्या आकर्षणाचं केंद्र असते. या खळीमुळे चेहऱ्याच्या सौंदर्यात दुप्पट भर पडते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. शाहरूख खान, दीपिका पादुकोन, आलिया भट्ट, प्रीति झिंटा, गुल पनाग असे कितीतरी स्टार्स आहेत ज्यांच्या खळी असलेल्या स्माइलने अनेकांना घायाळ केलं आहे. दुसऱ्यांची ही गालावर पडणारी खळी पाहून आपल्यालाही अशी खळी का नाही, अशी अनेकदा खंतही व्यक्त केली जाते. पण ही खळी पडते कशी याचा कधी कुणी विचार केलाय का? का काही लोकांच्या गालावर खळी असते आणि काहींच्या नाही? चला जाणून घेऊ याचं उत्तर....
हे आहे खळी पडण्याचं कारण...
काही अभ्यासकांनुसार, गालावर खळी पडण्याचं कारण हे जेनेटिक म्हणजेच आनुवांशिक आहे. म्हणजे आधीच्या पिढीकडून नंतरच्या पिढीला ही खळी आपोआप मिळते. पण याचा अर्थ हा नाही की, तुमच्या आई-वडिलांच्या गालावर खळी पडते तर तुमच्याही गालावर खळी पडेल. ही एक अनियमित विशेषता आहे. काही अभ्यासकांनी असेही आहेत जे म्हणतात की, खळी पडणे आनुवांशिकता गुण आहे हे सिद्ध करणारे पुरेसे पुरावे नाहीयेत.
छोटी मांसपेशी
एका दुसऱ्या थेअरीनुसार, काही लोकांमध्ये खळी पडते कारण त्यांच्या गालावर एक विशेष मसल असते जी इतरांच्या तुलनेत जास्त लहान असते. त्यामुळे गालावर खळी येते. गालामधील या मसलला जायगोमॅटिकस म्हटले जाते. ही मसल मधून विभागली गेली किंवा लहान राहिली तर गालावर खळी पडते.
लहानपणी असलेली खळी मोठ्यापणी गायब
अनेकांमध्ये असंही बघायला मिळतं की, काही लोकांच्या गालावर बालपणी खळी बघायला मिळते. पण ते जसजसे मोठे होत जातात त्यांची ही गालावरची खळी नाहिशी होत जाते. याचं कारण आहे बालपणी लहान मुलांच्या गालांमधील बेबी फॅट. पण लहान मुलं मोठी होत असताना तेव्हा हे बेबी फॅट नष्ट होऊ लागतात. त्यामुळे खळीही नाहिशी होते.
हनुवटीवरही असते खळी
अभिनेते विनोद खन्ना यांच्या हनुवटीवर खळी होती. अनेकांना असं वाटतं की, केवळ गालावरच खळी येते. हनुवटीवरही खळी येते. याचं कारण ना आनुवांशिक आहे ना मांसपेशी लहान असणं. हनुवटीवर खळी येते कारण जेव्हा बाळ आईच्या गर्भात वाढत असतं तेव्हा बाळाची उजव्या आणि डाव्या बाजूचं हनुवटीचं हाड जुळत नाही, त्यामुळे ही खळी इथे तयार होते.